महिला इंजिनीअरची बदलापूरमध्ये हत्या
By Admin | Published: March 9, 2017 01:15 AM2017-03-09T01:15:20+5:302017-03-09T01:15:20+5:30
बदलापुरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियरचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव पूनम गजभिये (३०) असून
बदलापूर : बदलापुरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियरचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव पूनम गजभिये (३०) असून, ती मुंबईतील एका कंपनीत नोकरीला होती. याप्रकरणी विजय जारकर (२५) याला अटक करण्यात आली आहे.
घटस्फोटीत पूनम व बदलापुरात मोबाइल दुरुस्तीचे दुकान चालवणारा विजय अडीच वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. सहा महिन्यांपूर्वी पूनमने बदलापूर गावातील ‘बदलापूर प्राइड’ इमारतीत फ्लॅट खरेदी केला होता. तिथे हे दोघे एकत्र राहत होते. त्यापूर्वी दोन वर्षांपासून हे दोघे रमेशवाडी येथे भाड्याने फ्लॅटमध्ये राहत होते. पूनम सॉफ्टवेअर इंजिनियर असताना बारावीपर्यंत शिकलेल्या विजय सोबत तिने असे राहणे पूनमच्या कुटुंबीयांना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांचा याला विरोध होता. त्यावरून मंगळवारी रात्री पूनम व विजय यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात विजयने पूनमच्या गळ््याभोवती स्कार्फ आवळून तिची हत्या केली. पूनमचा मृत्यू झाल्यानंतर गोंधळलेल्या विजयला काय करावे, हे सुचत नव्हते. त्यामुळे तो अडीच-तीन तास पूनमच्या मृतदेहाजवळ बसून विचार करत राहिला. काहीच न सुचल्याने आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत आला होता. त्याने त्याच्या एका मित्राला भेटून याबाबत सांगितले. या मित्राने त्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा सल्ला दिला. तसेच पोलिसांनाही माहिती दिली.
त्यानुसार पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज, सहाय्यक पोलीस आयुक्त घोरपडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक मधुकर पोळेकर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व त्यांच्या पथकाने विजयला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्य्क पोलीस निरीक्षक मधुकर पोळेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)