मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:07 AM2021-01-16T04:07:57+5:302021-01-16T04:07:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोबाइल चोरीच्या संशयातून आसिफ नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना मुसाफिर खाना रोड ...

Murder of a youth on suspicion of mobile theft | मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या

मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोबाइल चोरीच्या संशयातून आसिफ नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना मुसाफिर खाना रोड परिसरात घडली. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी जमाल इकबाल हुसेन (२१) याला अटक केली आहे.

एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुसाफिर खाना मशीद येथे एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती गुरुवारी सकाळी एमआरए मार्ग पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी पाठवला. यात, प्राथमिक अहवालात डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तरुणाजवळील डायरीतून त्याचे नाव आसिफ असल्याचे समजले.

पोलिसांनी स्थानिकांकडे चौकशी केली. त्यातून हुसेनचे नाव समोर आले. पथकाने हुसेनला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीत, हुसेन हा पायधुनी परिसरामध्ये फळे विकण्याचा व्यवसाय करतो. बुधवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास हुसेन झोपेतून उठला असताना, आसिफ तेथे चोरी करीत असल्याचा त्याला संशय आला, त्यावरून त्याने जवळील लाकडी बांबूने आसिफला बेदम चोप दिला. याच मारहाणीत आसिफचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

त्यानुसार एमआरए मार्ग पोलिसांनी हुसेनला अटक केली आहे.

.....

यापूर्वीच्या घटना

खांबाला बांधून हत्या

२७ डिसेंबर २०२० : चोरीच्या संशयातून शहजाद खान या तरुणाला सांताक्रुझ येथील मुक्तानंद पार्क येथे खांबाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत मृत्यू झाला.

....

२५ ऑक्टोबर २०२० : चोर असल्याच्या संशयातून कंत्राटदार सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत माजिद अली या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगेश कोडर, सूरज बोलके अशी अटक आरोपींची नावे आहेत.

....

७ जानेवारी : चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दुकलीला रंगेहाथ पकडून स्थानिकांनी अर्धनग्न करत बेदम चोप दिला. पुढे मुंडण करून त्याची धिंड काढली आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

नागरिकांनी कायदा हातात घेतल्याने, या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी १५ स्थानिकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Murder of a youth on suspicion of mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.