मुंबई : मित्राच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नोकरीला लावले. मात्र, पगार झाला असतानाही त्याने आईपासून लपवून ठेवत पैसे दारूसाठी खर्च केल्याच्या रागात, दोन मित्रांनी त्याची हत्या केल्याची घटना घाटकोपरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी नरेंद्र राणे (३२), राहुल राऊत (३०) यांना अटक केली आहे.अविनाश कुमार दुबे (२९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो घाटकोपर परिसरात आईसोबत राहायचा. राऊत आणि राणे यांनी त्याला मेट्रोमध्ये हेल्पर म्हणून नोकरीला लावले होते. काही दिवसांपूर्वी दुबेच्या आईने राणे आणि राऊतकडे पगाराबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी पगार कधीच झाला असल्याचे सांगितले. मात्र, दुबेने अद्याप पगार झाला नसल्याचे आईला सांगितले होते. ही बाब त्यांना समजताच, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी दुबेचे घर गाठले. तेव्हा तो दारूच्या नशेत पडला होता. दोघांनीही आईला पगार का दिला नाही, याबाबत विचारणा केली तेव्हा दुबेने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.याच रागात त्यांनी त्याला मारहाण केली आणि ढकलले. यात तो बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या घरच्यांनाही धक्का बसला आहे. सुरुवातीला या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करत, घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासाअंती दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मित्राने आईला पैसे न दिल्याच्या रागात हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:36 AM