मुंबई : चारित्र्याच्या संशयातून २० वर्षीय प्रेयसीची ओव्हल मैदानमध्ये निघृण हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर प्रियकर प्रेयसीच्या वडिलांसोबत तिचा शोध घेण्यासाठी भटकत होता. सलमान शेख असे प्रियकराचे नाव आहे. आझाद मैदान पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येचा उलगडा करत शेखला बेड्या ठोकल्या आहेत.मुंब्रा परिसरात २० वर्षीय नसरीन शेख कुटुंबियांसोबत रहायची. तिच्या वडिलांचा भंगार खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. नसरीन ही सीएसएमटी परिसरातील एका कफमध्ये नोकरीला होती. भायखळा परिसरात राहणाऱ्या शेखसोबत तिचे प्रेम होते. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.गेल्या काही दिवसांपासून तो नसरीनच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोघांमध्ये खटके उडायचे. दोघेही कामावरुन सुटल्यानंतर ते ओव्हल मैदानात गप्पा मारतअसत. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास नसरीन नेहमीप्रमाणे कामावरुन घरी जाण्यासाठी निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने वडिलांनी शोध सुरु केला. त्यांनी शेखकडे चौकशी केली. मात्र त्याच्याकडूनही तिच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. वडील उमर शेख यांनी आझाद मैदान पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरु केला. शोध सुरु असताना, सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ओव्हल मैदानात त्यांना गर्दी दिसली. त्यांनी तेथे पाहिले असता, रक्ताच्या थारोळ्यात त्यांना त्यांचीच मुलगी दिसून आली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत घोषित केले.नसरीनच्या वडिलांनी प्रियकरावर संशय व्यक्त केला. त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. सलमानकडे उलटतपासणी सुरु केली.पोलीस खाक्या दाखवताच, त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.हत्येचा कट पूर्वनियोजितनसरीन अन्य मुलांसोबत असलेले प्रेमसंबंध लपवत असल्याच्या संशयातून शेखने तिच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला. ठरल्याप्रमाणे त्याने चाकू खरेदी केला. सोमवारी रात्री नसरीन आणि शेख नेहमीप्रमाणे ओव्हल मैदानात भेटले. तेथेच त्याने नसरीनसोबत वाद घालून चाकूने तिच्यावर वार केले. यात ती जागीच ठार झाली. तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून त्याने घर गाठले. हत्येनंतर शेख नसरीनच्या वडिलांसोबत तिचा शोधण्याचे नाटक करत होता. तो रात्रभर त्यांच्यासोबत मुंबईतल्या विविध ठिकाणी फिरला.
चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची निर्घृण हत्या, पूर्वनियोजित कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:05 AM