मुंबई- ‘मर्डरवाले कुलकर्णी’ असे काहीसे अनोखे शीर्षक असलेले नवीन नाटक लवकरच रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने विनोदाचे अफलातून टायमिंग असलेले वैभव मांगले आणि संतोष पवार हे रंगभूमीवरील दोन हुकमी एक्के प्रथमच एकत्र आले आहेत.
नेहमीच वेगळ्या धाटणीची नाटके रंगभूमीवर आणणाऱ्या अष्टविनायक संस्थेचे ‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नाटक २४ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. यात वैभव मध्यवर्ती भूमिकेत असून, दिग्दर्शनाची धुरा संतोषने सांभाळली आहे. प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे. एकत्र काम करताना खूपच मजा येत आल्याचे दोघांचेही म्हणणे आहे.
वैभव-संतोषच्या जोडीला या नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून, सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत. याचे लेखन जयंत उपाध्ये यांनी, तर गीतलेखन वैभव जोशी यांनी केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, प्रकाश योजना रविरसिक यांची तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे.