‘म्युझियम आॅन व्हील्स’ला पाच हजारांहून प्रेक्षकांची पसंती
By admin | Published: January 9, 2016 02:35 AM2016-01-09T02:35:25+5:302016-01-09T02:35:25+5:30
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने आॅक्टोबर २०१५ मध्ये सुरू केलेल्या ‘म्युझियम आॅन व्हील्स’ या उपक्रमाला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतोय
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने आॅक्टोबर २०१५ मध्ये सुरू केलेल्या ‘म्युझियम आॅन व्हील्स’ या उपक्रमाला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतोय. अवघ्या काही महिन्यांत या उपक्रमाने पाच हजारांचा पल्ला ओलांडला असून हडप्पा संस्कृतीवरील प्रदर्शनाला पसंती मिळत आहे.
‘म्युझियम आॅन व्हील्स’ या वातानुकूलित बसमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी भारतात भरभराटीला आलेल्या हडप्पा संस्कृतीचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या संस्कृतीतील लोकांनी विस्तीर्ण रस्ते, आच्छादित सांडपाणी योजना आणि सार्वजनिक स्नानगृहे असणारी योजनाबद्ध शहरे विकसित केली होती. शिवाय, या संस्कृतीतील शिल्पकला, मातीची भांडी, अलंकारही उत्खननात सापडले आहेत. याचीच झलक या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ही बस मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत प्रवास करेल. या बसमध्ये कथाकथन, माहितीपट, हस्तकला यांच्या विविध उपक्रमांचाही आस्वाद घेता येणार आहे. तसेच डिजिटल टॅब्स, आॅडिओ व्हिज्युअल्सही यात आहेत. ही बस शाळा, महाविद्यालये, बृहन्मुंबई महानगरपालिकेची शैक्षणिक खाती, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती, कला आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये फिरणार आहे.
या बसच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्खननाचाही अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. शिवाय, विटा, मातीची भांडी बनविणे, हडप्पा संस्कृतीची मुद्रा आणि लिपी असेही आगळेवेगळे उपक्रम अनुभवता येणार आहेत. याविषयी संग्रहालयाच्या शिक्षण विभागाच्या साहाय्यक क्युरेटर बिलवा कुलकर्णी यांनी सांगितले की, दिवसेंदिवस ‘म्युझियम आॅन व्हील्स’ला वाढता प्रतिसाद असून जास्तीत जास्त पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, मार्च महिन्यात या बसमधील हडप्पा संस्कृतीचे प्रदर्शन बदलण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)