आंबेटेंभेचे भिमाई स्मारक रखडले
By admin | Published: December 5, 2014 11:17 PM2014-12-05T23:17:57+5:302014-12-05T23:17:57+5:30
सरकारी उदासिनतेमुळे या स्मारकाचे काम मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
सुधाकर वाघ, धसई
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ व मातोश्रींच्या जन्मगावास विसरलेल्या शासनास बऱ्याच काळच्या मागणी व संघर्षानंतर जाग आल्याने मुरबाड पासून १५ किमी. अंतरावर आंबेटेंभे येथे भिमाई स्मारक मार्गी लागले. परंतु, सरकारी उदासिनतेमुळे या स्मारकाचे काम मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे स्मारकासाठी आग्रही असलेल्या बहुजन समाजाचा पुरताच हिरमोड झालेला आहे.
तालुक्यातील मुरबाड, आंबेटेंबे, भालुक, वडवली या गावांभोवती महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नातेसंबंधाचे व आठवणींचे एक ऐतिहासिक वलय निर्माण झालेले आहे. ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बहुजनांचे व आंबेडकरी चळवळीतील आदर्शवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई या मुरबाडच्या सासुरवाशीण असल्या तरी आंबेटेंबे गावच्या माहेरवाशीण असल्याने त्यांच्या जन्मगावीच महामानव बाबासाहेबांच्या मातेश्रींचे स्मारक व्हायला हवे यासाठी संघर्ष सुरू झाला. अखेर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या पुढाकाराने मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे गावी १६ कोटी २४ लाख रूपये खर्च करून स्मारक उभे करण्याचे शासनाने आश्वासन दिल्यानंतर ९ नोव्हेंबर २०११ रोजी वन खात्याच्या सर्व तांत्रीक मंजुऱ्या घेवून स्मारक वास्तू, निवासी शाळा, मुला- मुलींचे वस्तीगृह, ध्यान धारणा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सांस्कृतीक केंद्र, संकुल अंतर्गत रस्ते, गटारे, कुंपण भिंत, पार्किंग, प्लॉट व तलाव सुशोभिकरण, सौर ऊर्जा यंत्र, तात्पुरते शेड , चौकीदार निवास, विद्युत जनित्र, पाणी पुरवठा व मल: नि:स्सारण अशा अद्ययावत सोयी सुविधांचे जागतिक दर्जाचे भिमाई स्मारक निर्माण करण्याच्या कामास ३ जून २०११ रोजी सुरूवात झाली. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे स्मारकापर्यंतचे म्हसा ते आंबेटेभे हे प्रस्तावित रस्तेच १६ लाख रूपये रोजगार हमी योजनेतून तर २८ लाख रु पये सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च करूनही निकृष्ट काम करून अर्धवट सोडून दिले आहेत. २०११ साली केलेल्या कामानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाच्या कामाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे ते मार्गी लागण्या ऐवजी रखडले आहे. हे स्मारक अपूर्ण ठेवल्याने संपूर्ण आंबेडकरवादी जनतेच्या भावनांची जणू शासनाने धुसमट केली आहे. ६ डिसेंबर २०१४ पर्यंत तरी या स्मारकाचे काम पूर्ण करून शासन खऱ्या अर्थाने महामानवास व भिमाईस श्रध्दांजली अर्पण करील असे मनाशी ठरवलेल्या
मुरबाड तालुक्यातील नव्हेच तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.