संग्रहालयातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचे होतेय दर्शन !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:26 AM2019-01-29T01:26:50+5:302019-01-29T01:27:25+5:30

सिनेरसिकांसाठी माहितीचा खजिना; भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय मुंबईकरांसाठी पर्वणी

From the museum to the magnificent history of Indian cinema, see! | संग्रहालयातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचे होतेय दर्शन !

संग्रहालयातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचे होतेय दर्शन !

Next

- अजय परचुरे 

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन सिनेरसिकांना होणार आहे. भारतीय सिनेमाचा १०० वर्षांचा इतिहास दर्शविणारे अनोखे संग्रहालय रसिकांसाठी खुले करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत या भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन झाले.

भारतीय सिनेमाचा १०० वर्षांचा इतिहास उलगडून दाखविणारे हे संग्रहालय सिनेरसिकांसाठी एक पर्वणीच आहे. या संग्रहालयात भारतीय चित्रपटाशी संबंधित दृश्ये, शिल्पे, ग्राफिक्स, चित्रपटाविषयीचे किस्से आणि कथा यांची मांडणी करण्यात आली आहे. हे संग्रहालय १४१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे.

दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय चित्रपट संग्रहालय’ तयार करण्यात आले आहे. मुंबईतील पेडर रोडवर स्थित गुलशन महल येथे हे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे काम तब्बल ४ वर्षे सुरू होते. भारतीय चित्रपट संग्रहालय हे दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे. नवीन संग्रहालय भवन ही ४ माळ्यांची इमारत असून याच्या प्रत्येक मजल्यावर भारतीय सिनेमाच्या जडणघडणीतील लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तर १९ व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक गुलशन महल इमारतीत सिनेमाच्या १०० वर्षांतील वापरण्यात आलेल्या तांत्रिक साधनांचा दुर्मीळ असा देखावा मांडण्यात आला आहे.

गुलशन महलमधील भारतीय सिनेमाची कहाणी
१९ व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक गुलशन महलमध्ये सिनेमा रसिक १०० वर्षांच्या भारतीय सिनेमाच्या दौऱ्यावर निघून जाण्याचा भास होतो. येथे उभारलेले प्रदर्शन हे नऊ विभागांत विभागण्यात आले आहे. द ओरिजन आॅफ सिनेमा, सिनेमा कम्स टू इंडिया, इंडियन सायलेंट फिल्म, एडवेंट आॅफ साऊंड, द स्टुडिओ एरा, द इम्पॅक्ट आॅफ वर्ल्ड वॉर २, क्रियेटिव्ह रेजोनेंस, न्यू-वेव एण्ड बियाँड तथा रिजनल सिनेमा असे ९ प्रकारचे विभाग करण्यात आले आहेत. दादासाहेब फाळके यांची पहिली निर्मिती असणाºया ‘राजा हरिश्चंद्र’ या १९१३ मधील पहिल्या मूकपटाचा जिवंत देखावा आपले लक्ष वेधून घेतो. तसेच या ९ विभागांत १०० वर्षांतील प्रादेशिक, बॉलिवूड सिनेमांची कृष्णधवल आणि रंगीत अशी असंख्य पोस्टर्स आहेत. तसेच या भागात ३० जण बसू शकतील असे एक मिनी थिएटरही उभारण्यात आले आहे.

तांत्रिक उपकरणांचा काळानुरूप वेध : संग्रहालयाच्या तिसºया मजल्यावर गेल्या १०० वर्षांत ध्वनी, कॅमेरा, संपादन, लाइट इफेक्ट, फ्लॅशबॅक टेक्निक, भारतीय सिनेक्षेत्रात आलेला रंगीत सिनेमा, कृष्णधवल सिनेमापासून रंगीत सिनेमापर्यंतचा प्रवास, गेल्या १०० वर्षांत वापरण्यात आलेले सिनेकॅमेरे यांची माहिती आणि त्यांच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत.

गांधी व सिनेमा विभाग : संग्रहालयाच्या दुसºया मजल्यावर ‘गांधी व सिनेमा’ हा विभाग आहे. यात भारतीय सिनेसृष्टीत गेल्या १०० वर्षांत महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित किंवा त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आलेल्या सिनेमांची माहिती देण्यात आली आहे. महात्मा गांधींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विजय भट्ट दिग्दर्शित ‘रामराज्य’ हा एकमेव सिनेमा पाहिला होता, अशी माहिती या संग्रहालयातून मिळते. खुर्चीवरती शांत बसलेल्या महात्मा गांधींचा तेजस्वी पुतळाही येथे उभारण्यात आला आहे.

अखिल भारतीय सिनेमा : संग्रहालयातील शेवटच्या म्हणजे चौथ्या मजल्यावर १०० वर्षांचा भारतीय सिनेमांचा धांडोळा घेण्यात आला आहे. यात शोमॅन राज कपूर यांचा ‘श्री ४२०’ सिनेमातील वेशात असलेला पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि भारतीय सिनेमात मोलाचे योगदान असणारे व्ही. शांताराम यांच्या सिनेमांची माहिती देणारे वेगळे दालन येथे उभारण्यात आले आहे.

बाल फिल्म स्टुडिओ
गुलशन महलच्या बाजूला ४ माळ्यांची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर आहे बाल फिल्म स्टुडिओ. या स्टुडिओत बालचित्रपट तयार करताना वापरण्यात येणारा कॅमेरा, प्रकाशयोजना साकारताना वापरली जाणारी उपकरणे, शूटिंग, गायन स्टुडिओ, संकलन याचे प्रत्यक्ष स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. तसेच एक क्रोमा स्टुडिओही तयार केला असून यात नेमके स्टंट प्रत्यक्षात कसे चित्रित केले जातात याचे प्रात्यक्षिकही दाखविले जाते.

Web Title: From the museum to the magnificent history of Indian cinema, see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.