संगीताची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील 'द साऊंड स्पेस' संस्थेनं एका अनोखा उपक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांना संगीताची आवड असूनही क्लासेसची फी परवडत नाही किंवा मग प्रवास करणं शक्य होत नाही. या दोन्ही अडचणींवर तोडगा काढण्यासाठी 'द साऊंड स्पेस' संस्थेच्या कामाक्षी खुराना आणि विशाला खुराना यांना एक अनोखी संकल्पना सुचली. संगीताच्या क्लासला पाल्याला पाठवणं पालकांना परवडत नाही आणि प्रवासही करणं कठीण वाटत असेल तर आपणच अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, या कल्पनेतून 'द साऊंड स्पेस ऑन व्हील्स' म्हणजे एक बस तयार करण्यात आली आहे.
संगीत शिकवणारी ही बस थेट विद्यार्थ्यांच्या दारात पोहोचणार आहे. या बसमध्ये संगीत शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आणि वाद्य आहेत. तसेच प्रशिक्षिक संगीत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मोफत संगीताचे धडे दिले जातील. मुंबईत शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात या उपक्रमाचा उदघाटन समारंभ झाला. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते.
"विद्यार्थ्यांसाठी संगीताचे क्लासेस जेव्हा सुरू केले तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात आली की पालक दिवसभर कामात व्यग्र असतात. किंवा क्लासेसला जाण्यासाठी प्रवास करणं काहींना शक्य नसतं. वेळेची खूप अडचण होते. मग आपणच आपला क्लास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला तर प्रश्न सुटेल आणि विद्यार्थ्यांनाही संगीताचं शिक्षण घेता येईल. या विचारातूनच 'द साऊंड स्पेस ऑन व्हील्स'ची संकल्पना पुढे आहे", असं विशाला खुराना यांनी सांगितलं.
बस मुंबईत विविध ठिकाणी जाईल आणि तिथे उपस्थित मुलांना प्रशिक्षित शिक्षकांकडून संगीताचे धडे मिळतील. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्यामुळे सर्वसामान्य मुलांसोबतच वंचित कुटुंबांतील मुलांनाही संगीताचा आनंद घेता येईल. हळूहळू हा उपक्रम राज्यभरातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.