मुंबई : सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘लाइव्ह टू सिंग’ या संगीत मैफिलींचे आयोजन मुंबई आणि परिसरातील विविध वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये केले जाणार आहे.
विशेष म्हणजे दिव्यांग वाद्यवृंदांचे पथक ही मैफल सादर करणार आहे. ‘उडान’ असे या चमूचे नाव असून, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दिव्यांगांच्या पंखांनाही बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोरोनाकाळात बहुतांश लोकांनी धान्यवाटप किंवा अन्य गरजेच्या वस्तू देण्यावर भर दिला. परंतु, संपूर्ण जग थांबले असताना अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमात एकटे पडलेल्यांचा विचार कोणीच केला नाही. कोरोना संसर्गाच्या भीतीने नातेवाइकांनीही त्यांची भेट घेणे टाळले. त्यामुळे त्यांच्या एकटेपणात आणखी भर पडली. या अनोख्या संगीत मैफलीच्या माध्यमातून अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न आहे. मुंबई आणि परिसरातील वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांत अशा प्रकारचे १० कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, २५ मार्च रोजी डोंबिवली पूर्व येथील अनाथाश्रमात पहिला कार्यक्रम होणार आहे. या वेळी त्या वृद्धाश्रमातील सर्वांसाठी भोजनव्यवस्थाही करण्यात येणार आहे.