लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व जिल्ह्यात ‘किसान बाग’ आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आंबेडकर भवन येथे गुरुवारी बैठक झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत किसान बाग आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. कृषी कायद्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन सुरू आहे. यासोबतच मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकऱ्यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय ‘किसान बाग’ आंदोलन करण्याची घोषणा या मेळाव्यात करण्यात आली. यावेळी आंबेडकर म्हणाले की, धर्मांध जातीयवादी शक्तींनी देशातील शेकडो मुसलमानांचा छळ करत माॅबलिंचिंगसारखे अत्याचार केले, हजारो दलितांचे शोषण सुरू आहे. वर्तमान व्यवस्थेने लाखो शेतकऱ्यांचा इतका छळ केला की त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे. सी. ए. ए. आणि एन. आर. सी.विरोधातील शाहीन बाग आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. पंजाबमधील शेतकरऱ्यांना सहानुभूती दाखवत मुस्लिम समाजाने आपापल्या शहरांमध्ये किसान बाग आंदोलन सुरू करण्याचे घेतलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे, असे सांगतानाच किसान बागच्या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.
.........................................