मुंबई : इस्लाम धर्मातील रमजान महिन्यातील शब-ऐ-कद्र (बडी रात) शनिवारी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. पावसाची रिपरिप सुरु असतानाही शहर व उपनगरातील मशीद, दर्गाह व स्मशानभूमीच्या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमलेले होते. नमाज व कुराण पठण करीत पूर्ण रात्र जागून काढली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, रविवारी २७ वा रोजा (उपवास) असून अनेक हिंदू बांधव यादिवशी उपवास करणार आहेत. रमजान ईद अवघ्या तीन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी खरेदी वाढली आहे.रमजान महिन्यात २१,२३,२५ व २७ व्या रात्रीला ‘ताक रात’ म्हणजे रात्रभर जागून ईश्वर भक्ती करावयाची असते. शनिवारी २७ वी रात्र असल्याने शहर व उपनगरातील मशीदी गर्दीने गजबजलेल्या होत्या. गेल्या २६ दिवसापासून रोज रात्री पठण केल्या जाणाऱ्या ‘तरावीह’च्या नमाजमध्ये आज कुराणाचे पूर्ण वाचन करण्यात आले. त्यानंतर मौलवी व पेशईमामांकडून प्रेषित मंहमद पैंगबर यांची शिकवण, जीवनपद्धती,धार्मिक आचरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनेक बांधव मशीदीमध्ये पहाटेपर्यत नमाज व कुराण पठण करीत होते. दरम्यान, रविवारी २७ वा रोजा असून ईद तीन दिवसावर आल्याने त्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मसाल्याचे पदार्थ, कपडे खरेदी करण्यासाठी अबालवृद्धाच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार, महंमद अली रोड गजबजून गेला आहे. (प्रतिनिधी)
मुस्लीम बांधवांनी जागविली ‘बडी रात’!
By admin | Published: July 03, 2016 3:35 AM