धर्मगुरुंचे आवाहन
मुबई : कोरोनामुळे लॉकडाऊन झालेले असल्याने मुस्लिम समाजाने शब ए बारातच्या रात्री घराबाहेर पडू नये व घरात राहूनच प्रार्थना करावी असे आवाहन मुस्लिम समाजातील धर्मगुरुंनी केले आहे.
मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की, नागरिकांनी घरात राहुन प्रार्थना करावी व कोरोना विरोधातील लढ्याला सक्रिय प्रतिसाद दयावा. कब्रस्तानमध्ये जाणे व मशीदीत जाणे टाळावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. जे सर्व धर्मिय रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत त्यांच्या साठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकार व प्रशासन कोरोना ला हटवण्यासाठी प्रयत्न करत असताना मुस्लिम समाजाने देखील पूर्ण पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. पोलिस, प्रशासन, डॉक्टर व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी कोरोना संपुष्टात यावा यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत त्यांच्यासाठी मुस्लिम समाजाने प्रार्थना करुन त्यांचे आभार मानावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. कोरोना चा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोणताही निष्काळजीपणा करु नये असे मौलानांनी सांगितले.
कोरोनाची रुग्णसंख्या मुंबई व महाराष्ट्रात दिवसेंदिवस अतिशय वेगाने वाढत आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला अहॆ. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नये असे आवाहन रझा अकादमीचे मौलाना सईद नुरी यांनी केेले आहे.
शब ए बारातमध्ये कब्रस्तानमध्ये जावून पूर्वजांसाठी प्रार्थना केली जाते. रात्रभर मशीदीत बसून प्रार्थना केली जाते. माहिम जामा मशीदीतर्फे देखील मशीदीत न येता व कब्रस्तानमध्ये न जाता घरात राहून प्रार्थना करावी अशी उद्घोषणा ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येत असल्याची माहिती विश्वस्त फहद पठाण यांनी दिली.