मुस्लीम नातीचे पालकत्व दिले हिंदू आजीकडे! उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:09 AM2017-11-17T03:09:40+5:302017-11-17T07:10:52+5:30

ही मुलगी आता आठ वर्षांची आहे. जन्माने ती मुस्लीम आहे. तिच्या वडिलांचे कुटुंब मुस्लीम असून, त्यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नांदवी गावात आहे.

 Muslim grandparents gave Hinduity to the Guardian! High Court Decision | मुस्लीम नातीचे पालकत्व दिले हिंदू आजीकडे! उच्च न्यायालयाचा निर्णय

मुस्लीम नातीचे पालकत्व दिले हिंदू आजीकडे! उच्च न्यायालयाचा निर्णय

Next

अजित गोगटे
मुंबई : निरागस असणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे; आणि निरागसपण जपणे यातच मुलांचे कल्याण आहे,
असे अधोरेखित करत मुंबई उच्च न्यायालयाने एका मुस्लीम अल्पवयीन नातीचे पालकत्व तिच्या आईकडच्या हिंदू आजीकडे दिले आहे.
ही मुलगी आता आठ वर्षांची आहे. जन्माने ती मुस्लीम आहे. तिच्या वडिलांचे कुटुंब मुस्लीम असून, त्यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नांदवी गावात आहे. तिच्या आईचे कुटुंब मूळचे केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील पेरामंगलमचे असून ते हिंदू आहे. ही मुलगी, मधल्या काही दिवसांचा अपवाद वगळता, नांदवी येथील आजीकडे राहूनच लहानाची मोठी झाली आहे. तेथे ती शाळेत जात आहे व कुरआन वाचता यावे यासाठी सकाळच्या वेळी मदरशात जाऊन अरबी भाषाही शिकत आहे. या मुलीचे पालकत्व आणि ताबा आपल्याला मिळावा यासाठी तिच्या दोन्ही आज्यांमध्ये वाद सुरू होता. मे २०१४मध्ये माणगाव येथील जिल्हा न्यायाधीशांनी केरळमधील हिंदू आजीला या मुलीचे पालक नेमून तिचा ताबा त्या आजीकडे देण्याचा आदेश दिला. नांदवी येथील मुस्लीम आजीने याविरुद्ध केलेले अपील उच्च न्यायालयात प्रलंबित होते. ते निकाली काढताना न्या. मृदुला भाटकर यांनी या वादाचे सर्व पैलू तपासून पाहिले आणि ही अल्पवयीन मुलगी जन्माने व धर्माने मुस्लिम असली तरी तिने तिच्या हिंदू आजीकडे राहण्यातच तिचे कल्याण आहे, असा निष्कर्ष काढला.
सन १८६० चा ‘गार्डियन्स अ‍ॅण्ड वॉर्ड्स अ‍ॅक्ट’ व मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील अनाथ मुलांचा ताबा आणि पालकत्व याविषयीच्या तरतुदींचे विश्लेषण करून न्या. भाटकर यांनी म्हटले की, ही मुलगी मुस्लिम आहे व जन्माने मिळालेल्या धर्माचे पालन करणे हा तिचा मुलभूत हक्क आहे. ती १५ वर्षांची झाल्यावर एक पर्दानशीन स्त्री म्हणून पाळायचे सर्व रीतीरिवाज तिला मुस्लिम घरात राहूनच शिकता येतील, हे सर्व खरे आहे. तरीही गेल्या काही वर्षातील घटनांचा संगतवार आढावा घेतल्यावर आणि या मुलीला विश्वास घेऊन तिच्या मनाचा धांडोळा घेतल्यावर मला असे जाणवते की, नांदवी येथील आजीच्या घरी या मुलीच्या मनात केरळच्या हिंदू आजीच्या कुटुंबाविषयी हेतुपुरस्सर दुस्वास आणि सूडाची भावना पेरण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. ती केरळच्या आजीच्या कुटुंबाविषयी बोलताना पढवलेले बोलत असावी, असे मला जाणवले.
या पार्श्वभीवर न्या. भाटकर यांनी निकालपत्रात लिहिले की, राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ नुसार प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा हक्क असला तरी या मुलीचे कथानक पाहता तिचा जगण्याचा मुलभूत हक्क धर्माचरणाच्या हक्काहून अधिक श्रेष्ठ मानायला हवा. खरं तर सर्वच धर्मांत चांगली शिकवण दिली जाते आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर केला जातो. मुलांवर अपप्रवृत्ती, अप्रामाणिकपणा आणि खोटारडेपणाचे संस्कार करावे, असे कोणताही धर्म शिकवत नाही. लहान मुल निरागस असते. किंबहुना निरागस असणे हाच मुलांचा स्थायीभाव असतो. त्यामुळे मुलांच्या कल्याणाचा विचार करताना त्या मुलाचे निरागसपण जपणे हेही त्यात अंतभूत असते. निरागस असणे हाच मुळी प्रत्येक लहान मुलाचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे मूल जर विकृत वातावरणात राहिले तर ते इतरांविषयी सतत वाईट विचार करणे, खोटेनाटे आरोप करणे आणि सूडभावना बाळगणे यासारख्याच वाईट गोष्टी शिकेल. यामुळे त्या मुलाचे निरागसपण पार कुस्करले जाईल आणि मानसिक विकार खुंटून जाईल.
मुलीचे आजोळ मुळचे केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील आहे. नातीचा सांभाळ करण्यासाठी तिच्या केरळमधील हिंदू आजीने आता डोंबिवलीत बि-हाड केले आहे. (या अल्पवयीन मुलीला भावी आयुष्यात त्रास होऊ नये यासाठी या बातमीत तिचा किंवा तिच्या दोन्ही आज्यांचा नामोल्लेख मुद्दाम टाळला आहे.)
आईचा खून, वडिलांना फाशी
या मुलीची आई मूळची केरळची आणि धर्माने हिंदू होती. वडील मुळचे नांदवीचे व धर्माने मुस्लिम. दोघेही दुबईत नोकरी करायचे. तेथे त्यांचे प्रेम जुळले व पुढे विवाह झाला. विवाहानंतर तीन महिन्यांनी हिच्या आईनेही मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यामुळे ही मुलगी मुस्लिम आई-वडिलांच्या पोटी जन्माला आल्याने जन्माने ती मुस्लिम झाली. बाळंतपणासाठी केरळला माहेरी आलेली हिची आई, नंतर येऊन घेऊन जाते, असे सांगून ही सहा महिन्यांची असताना तिला केरळच्या आजीकडे ठेवून, दुबईला पतीकडे निघून गेली. हिच्या वडिलांनी तिच्या आईचा दुबईत गळा आवळून खून केला. खटला चालला व त्यांना फाशीची शिक्षा झाली.
उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असताना नांदवीच्या आजीने माणगाव पोलीस ठाण्यात केरळच्या आजीच्या कुटुंबाविरुद्ध ‘पॉस्को’ कायद्याखाली तक्रार दाखल केली. केरळच्या आजीकडे गेली असता तेथे मामाने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, अशा स्वरापाची ही तक्रार होती. पुढे ही तक्रार केरळमध्ये वर्ग झाली. तेथील पोलिसांनी तपास केला व तक्रारीत तथ्य नसल्याचा ‘बी समरी’ अहवाल न्यायालयात सादर केला. त्यावर अजून निकाल व्हायचा आहे. म्हणूनच ही मुलगी आजीसोबत डोंबिवलीत राहात असताना तिच्या मामांनी, त्यांच्यावरील खटल्याचा निकाल होईपर्यंत, तेथे अजिबात फिरकू नये, असा आदेश न्या. भाटकर यांनी दिला.
दबावासाठी खोटी फिर्याद
या मुलीच्या मामांविरुद्धच्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. परंतु न्या. भाटकर यांनी सर्व तथ्यांचा विचार करून आणि मुलीशी दोन वेळा संवाद साधून ही फिर्याद खोटी असल्याचा कयास केला. दुबईत मुस्लिम शरियत कायदा आहे. त्यानुसार खून झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांनी माफ केले तर खुन्याची फाशी रद्द होऊ शकते. यासाठी या मुलीच्या केरळमधील आजीने व मामांनी दुबईच्या न्यायालयात माफीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी नांदवीच्या आजीने आपल्या सुनेच्या माहेरच्यांवर दबाव आणण्याकरता या मुलीच्या मामाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची खोटी फिर्याद केली असावी, असा तर्कही न्या. भाटकर यांनी काढला. या दोन्ही आज्यांमधील भांडणात परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी या निरागस नातीचा प्याद्याप्रमाणे वापर केला जावा, याचा निकालपत्रात धिक्कार करण्यात आला.
आदेशातील महत्त्वाचे मुद्दे...
या मुस्लीम मुलीचा ताबा तत्काळ तिच्या आईकडील हिंदू आजीकडे दिाला जावा.
या आजीने नातीला घेऊन डोंबिवली येथेच राहावे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिला, नातीला केरळला किंवा महाराष्ट्राबाहेर कुठेही जाता येणार नाही.
या नातीचे आजीने उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी नव्या शाळेत (डोंबिवलीतील) नाव घालावे. किंवा शक्य असेल तर तिला माणगाव येथील शाळेत वार्षिक परीक्षेस बसू द्यावे.
रमझान ईद, बकरी ईद, मुहर्रम व मुस्लिमांच्या इतर सणांच्या वेळी या मुलीला तिच्या नांदवी येथील मुस्लीम आजीकडे पाठवावे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत नातीचे वास्तव्य दोन्ही आज्यांकडे निम्मे-निम्मे असेल.

Web Title:  Muslim grandparents gave Hinduity to the Guardian! High Court Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.