मुस्लिम पुरुष अनेक विवाह नोंदणीस पात्र; तिसरा विवाह करणाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:43 PM2024-10-23T12:43:40+5:302024-10-23T12:44:16+5:30
गेल्या वर्षी फेब्रुवारीत या संबंधीचा अर्ज दाखल करण्यात आला होता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुस्लिम पुरुष एकापेक्षा जास्त विवाहांची नोंदणी करू शकतो. कारण त्याचा वैयक्तिक कायदा अनेक विवाह करण्यास परवानगी देतो, असे म्हणत न्यायालयाने एका मुस्लिम पुरुषाचा तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा केला.
न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने ठाणे येथील उपविवाह नोंदणी कार्यालयाला एका मुस्लिम पुरुषाने अल्जेरियन महिलेबरोबर झालेल्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्याबाबत हे निर्देश दिले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत हा अर्ज दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अंतर्गत विवाहाची व्याख्या केवळ एकाच विवाहापुरती मर्यादित आहे. त्यात अनेक विवाहांचा समावेश नाही, असे म्हणत अधिकाऱ्याने तिसऱ्या विवाह नोंदणीस नकार दिला. त्यामुळे या दाम्पत्याने संबंधित अधिकाऱ्यांना विवाह नोंदणीचे निर्देश द्यावेत, यासाठी याचिका दाखल केल होती.
विवाह नोंदणी कायद्यातून सूट
मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्यांतर्गत मुस्लिम पुरुष एकाच वेळी चार विवाह करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अंतर्गत मुस्लिम पुरुषांच्या बाबतीतही फक्त एकच विवाह नोंदविला जाऊ शकतो, हे अधिकाऱ्याचे म्हणणे आम्ही स्वीकारू शकत नाही. विवाह नोंदणी कायद्यातून मुस्लिम वैयक्तिक कायदा वगळण्यात आला आहे, असे सूचित करणारे आमच्यापुढे काहीही नाही. त्यातही याच विवाह कार्यालयाने याचिकादाराच्या दुसऱ्या विवाहाची नोंदणी केली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
दहा दिवसांत नोंदणी करा
याचिकादाराने काही कागदपत्रे सादर केली नसल्याचे विवाह नोंदणी कार्यालयाने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने याचिकादाराला सर्व कागदपत्रे विवाह नोंदणी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच विवाह नोंदणी कार्यालयाला याचिकादाराला वैयक्तिक सुनावणी देऊन दहा दिवसांत त्याच्या तिसऱ्या विवाह अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.