Join us

मुंब्य्रात शुक्रवारी मुस्लीम मूक मोर्चा

By admin | Published: October 04, 2016 5:18 AM

मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर आता मुस्लीम आरक्षणासाठी राज्यभरात मुस्लीम मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी मुंब्रा येथे राज्यातील पहिल्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर आता मुस्लीम आरक्षणासाठी राज्यभरात मुस्लीम मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी मुंब्रा येथे राज्यातील पहिल्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मुस्लीम आरक्षण संयुक्त कृती समितीच्या वतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. मुस्लीम संघटनांची सोमवारी हज हाउस येथे बैठक झाली. मौलाना आझाद विचार मंचने आयोजिलेल्या या बैठकीला राज्यभरातील चारशेवर संघटना, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी राजकीय पक्ष, संघटनाविरहित मुस्लीम आरक्षण कृती समितीची स्थापना करून, विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्याबाबत विचार मंचचे अध्यक्ष खा. हुसेन दलवाई, मराठा महासंघाचे श्रीमंत कोकाटे, सय्यद अली, मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष इकबाल अन्सारी, सुशिलाताई मुराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. मराठा समाजाप्रमाणेच मुस्लीमही विकासापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. आघाडी सरकारने शिक्षणासाठी दिलेले ५ टक्के आरक्षण कोर्टाने कायम ठेवले होते. मात्र, युती सरकारने ते रद्द केले. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही न्या. सच्चर आयोग, रंगनाथ मिश्रा आयोग डॉ. रेहमान समितीच्या शिफारशीनुसार ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी, यासाठी मूक मोर्चा काढून सरकारवर दबाव आणला जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)