मुंबई
पश्चिम रेल्वेसाठी कार्यरत असणाऱ्या एका तिकीट तपासनीसाच्या (टीसी) वादग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. संबंधित टीसीने मुस्लिम आणि मराठी व्यक्तींबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. "मी मुस्लिम आणि मराठी लोकांसोबत व्यवहार करत नाही. त्यांना कोणताही नफा देऊ इच्छित नाही", अशा प्रकारचं विधान या टीसीनं केलं आहे. याप्रकरणाची पश्चिम रेल्वेनंही दखल घेतली असून टीसीला तत्काळ पदावरुन निलंबीत केलं आहे आणि चौकशी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.
विक्रोळी येथील रहिवासी असलेल्या आशिष पांडे नावाच्या तिकीट तपासनिसाची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगण्यात येत आहे. एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या या ४९ सेकंदाच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यानं मराठी आणि मुस्लिम लोकांशी व्यवहार करत नाही असं वादग्रस्त विधान केलं आहे.
"सर, मी यूपीचा आहे. माझं नाव आशिष पांडे आहे. मी विक्रोळीच्या टागोरनगर येथे राहातो. मी मुस्लिम आणि मराठी लोकांशी व्यवहार करत नाही. कोणताही रिक्षाचालक जर मराठी किंवा मुस्लिम असेल तर अशा रिक्षातही मी बसत नाही. यूपीवाला असेल तरच त्याच्या रिक्षात मी बसतो. जेव्हा तुमचा नंबर मला मिळाला तेव्हा मी तुम्हाला मेसेजही केला होता. ट्रू कॉलरमध्ये जेव्हा तुमचं नाव मला दिसलं तेव्हा कळलं तुम्ही मराठी आहात. त्यामुळे तुमच्यासोबत व्यवहार करायचा नाही हे मी ठरवलं. मी तुम्हाला नफा मिळवू देणार नाही. १७७० घेऊन मी आज नऊ वाजता कामावर जातोय. १० वाजेपर्यंत मी ५ हजार रुपये कमावलेले असतील. मला पैशाचा गर्व नाही. पण मी हे निश्चित केलंय की मुस्लिम आणि मराठी माणसाला मुंबईत राहून मी एक रुपयाचाही धंदा देणार नाही", असं संभाषण ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. पश्चिम रेल्वेकडून कारवाईसोशल मीडियामध्ये ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनंही याची दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित टीसीचं निलंबन करण्यात आलं असून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. "आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलं आहे. धार्मिक समुदाय आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या कर्मचाऱ्याला चौकशी होईपर्यंत निलंबीत करण्यात आले आहे. चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल" असं ट्विट पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाकडून करण्यात आले आहे.
लाच घेतल्याचा संशयएक्सवर व्हायरल झालेल्या ट्विटवर नेटिझन्सने काही सवाल उपस्थित केले आहेत. आशिष पांडेच्या विधानाचा निषेध करत अनेकांनी त्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर त्याने केलेल्या ५ हजार रुपयांच्या कमाईच्या टिप्पणीवरही लाच घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचा संशय व्यक्त केला आहे. "एका तासात ५ हजार रुपयांची कमाई? तो लाच घेण्याबाबत बोलत आहे का?", अशी कमेंट एका यूझरने केली आहे. तसंच काहींनी या ५ हजार रुपयांच्या कमाईची आधी चौकशी केली पाहिजे असंही म्हटलं आहे. "एका तासात ५ हजार रुपये कमावण्याच्या त्याच्या दाव्याची आधी चौकशी करा. तो नेमकं करतो काय? पैसे छापण्याचा धंदा आहे का त्याचा?", असं एका यूझरनं म्हटलं आहे.