मुंबई : काँग्रेस पक्षात शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी समर्थन देण्यावरुन सरळ दोन गट पडले आहेत. राज्यातील पक्षाचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याला विरोध केला आहे तर प्राप्त राजकीय परिस्थितीत आपण यावर भूमिका घेतली पाहिजे असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी त्याचे समर्थन केले आहे.
संजय निरुपम यांनी देखील सेनेसोबत जाऊ नये असे म्हटले आहे. याच दरम्यान, खा. हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी समर्थन दिले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे.प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्टÑपती बनवताना आपण शिवसेनेचा पाठिंबा घेतला होता, हे लक्षात घेता आज भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून आपण शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
एक धर्म, एक पक्ष, एक राष्ट्र आणि एक नेता ही भाजपची भूमिका हाणून पाडायची असेल तर हे करावे लागेल. शिवसेनेला समर्थन देताना त्यांचे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही त्यांना दिला पाहिजे, असे सांगून दलवाई म्हणाले, भाजपने एकाही मुस्लीम आमदाराला उमेदवारी दिली नाही, त्याउलट शिवसेनेने साबिर शेख यांना मंत्री केले होते. यावेळी अब्दूल सत्तार यांना उमेदवारी दिली. राज्यात भाजपची सत्ता आली तर त्याचा परिणाम काँग्रेसच्या वाढीवर होईल. पक्ष वाढवणे, टिकविण्याचाही विचार पक्षाने गांभीर्याने केला पाहिजे.भाजप सरकारची मॉब लिंचिंगसाठी समर्थन देणारी, भूमिका व बाबरी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या संभाव्य परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील रहाणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.अलीकडे शिवसेनेची भूमिका सर्वसमावेशकअलीकडेच शिवसेना अधिक सर्वसमावेशक भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच भाजपला सत्तेत येण्यापासून रोखणे अत्यावश्यक आहे. जर तसे झाले तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा संजीवनी मिळेल, असेही दलवाई म्हणाले.