मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी संवेदनशील असणे आवश्यक - भालचंद्र मुणगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:07 AM2018-12-29T04:07:19+5:302018-12-29T04:08:50+5:30
मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असायला हवे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खार पूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था आयोजित दोन दिवसीय २० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे उद्घाटन करताना केले.
मुंबई : मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असायला हवे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खार पूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था आयोजित दोन दिवसीय २० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे उद्घाटन करताना केले. जगातील कोणताही विषय किचकट नसतो. साहित्य निर्माण करण्यासाठी विद्वत्तेपेक्षा संवेदशीलता महत्त्वाची असते. तसेच जगातील दहा मोठ्या देशांमध्ये लहान मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिले जाते. लहान मुलांवर कोठलेही ओझे न टाकता त्यांना समजेल अशा मातृभाषेत त्यांना शिकवले जाते. मातृभाषेतून शिक्षण देताना मुलांना त्यांचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख होते. इंग्रजीला विरोध न करता उत्तम इंग्रजी यायलाच हवे. मराठी-इंग्रजीचा वाद निव्वळ मूर्खपणाचा आहे, असे मत मुणगेकर यांनी व्यक्त केले.
२७ डिसेंबर आणि २८ डिसेंबर २०१८ या दोन दिवसांत २० व्या बाल कुमार साहित्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष विद्यार्थी सोनाली जाधव, स्वागताध्यक्ष हितीक्षा पटेल, शालेय मुख्यमंत्री ओम्कार पाटील, यश लाड, दिव्याराणी तापकीर, आरुषी पेंढारकर आदी विद्यार्थी प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे संमेलन संपन्न झाले. विद्यार्थीच अध्यक्षकेंद्रित साहित्य संमेलने आयोजित करावीत व साहित्यिक मूल्ये बालपणापासूनच त्यांच्यात रुजवावीत, असा सूर संमेलनात उमटला.
विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेत त्यांच्या मनातील प्रश्न विचारले आणि त्याला त्यांच्याकडून उत्तरेही दिलखुलास पद्धतीने मिळाली व मार्गदर्शन केले.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात ६५० विद्यार्थी व ८० शिक्षक यात सहभागी झाले होते.