एनसीबीची कारवाई
मुंबई : आपल्या विशिष्ट चवीच्या पानामुळे महानगर व परिसरात प्रसिद्ध असलेल्या रामकुमार तिवारी ऊर्फ मुच्छड पानवाला याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. गांजाची तस्करी व विक्रीत त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे समजते.दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथे त्याच्या पानाचे दुकान आहे. एनसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या दुकानातून एनडीपीएस पदार्थही जप्त करण्यात आला. त्याला सोमवारी समन्स बजाविले होते. चौकशीनंतर त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला एनसीबीने अटक केली.
दरम्यान, पाेलिसांनी शनिवारी खार व वांद्रे भागातील एक ब्रिटिश नागरिक करण सजनानी व दोन महिलांना परदेशी २०० किलो ड्रग्जसह अटक केली होती. त्यांच्या चौकशीत पानवाल्याचे नाव समोर आले होते. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्याच्या पान दुकानात ‘ओजी कुश’ (गांजाच्या एक तण) आयात करण्यात येत असल्याची कबुली सजनानीने दिली हाेती. पानवाला त्याचा वापर ठराविक ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पानातून करीत असल्याचा संशय आहे. याबाबत चौकशीत त्याला समाधानकारक खुलासा करता आला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यतापानवाला मूळचा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील तिवारीपूर येथील आहे. त्याच्या मुच्छड पानवाला दुकानातून रोज हजारो पानांची विक्री होते. त्याच्या ग्राहकांत बॉलिवूड सेलिब्रिटी, व्यापारी, उद्योगपतींचा समावेश आहे. त्याच्या चौकशीत गांजा असलेले पान खरेदी करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.