मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या राज्यभरात मूक निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:56 AM2018-12-04T05:56:31+5:302018-12-04T05:56:37+5:30
मुस्लीम समाजाला काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने मान्यतेची मोहर उमटवूनही मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा अद्याप अधांतरी आहे.
मुंबई : मुस्लीम समाजाला काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने मान्यतेची मोहर उमटवूनही मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा अद्याप अधांतरी आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गुंडाळल्याने मुस्लीम समाजात नाराजी आहे. या प्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुस्लीम समाजातर्फे ५ डिसेंबरला राज्यभरात मूक निदर्शने करण्यात येतील.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ५ डिसेंबरला राज्यात विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारी मुस्लीम समाज मूक निदर्शने करेल, असे भारतीय मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद पाशा यांनी सांगितले. हाताला काळी फित बांधून शांततेत निदर्शने करण्यात येतील. मुस्लीम आरक्षणाला धर्माच्या आधारावर नाकारले जात आहे. मात्र, आमची मागणी सामाजिक, आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षणाची आहे, असे प्रा. पाशा, ताहिरा शेख, अश्रफ खान व सिम्मी शेख म्हणाले. मूक निदर्शनांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन देण्यात येईल.