एमयूटीपी-२ प्रकल्प २0१६पर्यंत पूर्ण होईल
By Admin | Published: July 25, 2015 01:49 AM2015-07-25T01:49:41+5:302015-07-25T01:49:41+5:30
अवाढव्य खर्च वाढलेल्या एमयूटीपी-२ मधील सर्व रेल्वे प्रकल्प डिसेंबर २0१६ पर्यंत पूर्ण केले जातील, अशी माहिती एमआरव्हीसीचे (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)
सुशांत मोरे, मुंबई
अवाढव्य खर्च वाढलेल्या एमयूटीपी-२ मधील सर्व रेल्वे प्रकल्प डिसेंबर २0१६ पर्यंत पूर्ण केले जातील, अशी माहिती एमआरव्हीसीचे (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी लोकमतशी बोलताना दिली. यातील प्रकल्पांचा खर्च वाढलेला असला तरी त्यासाठी वेळेत निधी उभा करून प्रकल्प पूर्ण केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एमआरव्हीसीअंतर्गत एमयूटीपी-२ ची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत सुरुवातीला पाच हजार ३०० कोटी रुपये होती. एमयूटीपी-२ प्रकल्प २००८-०९ मध्ये मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात प्रकल्पांच्या कामाला २०१० नंतरच सुरुवात करण्यात आली. प्रकल्पामध्ये राज्य सरकार आणि रेल्वे हे ५०:५० टक्के भागीदार आहेत. त्यामुळे
या दोघांकडूनही प्रत्येक वर्षी निधी देण्यात येतो. मात्र एमयूटीपी-२ मधील प्रकल्पांचा खर्च गगनाला भिडल्याने यातील प्रकल्प पूर्ण करण्यास एमआरव्हीसीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. औपचारिकता पूर्ण करण्यात वेळ गेल्याने एमयूटीपी-२ मधील प्रकल्पांची एकूण किंमत ही जवळपास आठ हजार कोटींपर्यंत गेली. एमयूटीपी-२ मधील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी सीएसटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावरपर्यंत विस्तार, हार्बरवर बारा डबा लोकल, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे.