नवी दिल्ली ( Marathi News ): भारतात येत असताना अरबी समुद्रात हल्ला झालेले जहाज मुंबईच्या बंदरावर पोहचले आहे. २३ डिसेंबरला सौदी अरेबियातून मंगळुरूला येणाऱ्या एमव्ही केम प्लूटो या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. या जहाजात २१ भारतीय होते. आता हे जहाज सोमवारी मुंबई बंदरात पोहोचले. नौदल या हल्ल्याची चौकशी करणार आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही केम प्लूटो जहाजावर झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे जहाजाचे किती नुकसान झाले याचा तपास नौदलाचे पथक करत आहे. याशिवाय अरबी समुद्रात हा हल्ला कसा झाला याचाही तपास करण्यात येत आहे. यानंतर भारतीय नौदलाच्या युद्धनौका भारतीय आणि इतर जहाजांच्या सुरक्षेसाठी परिसरात गस्त घालतील.
अमेरिकेचा दावा- इराणने हल्ला केला होता
या जहाजावरील हल्ल्यासाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरले होते. इराणमधून सोडण्यात आलेल्या ड्रोनने या जहाजावर हल्ला केल्याचा दावा अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनने केला होता. मात्र, इराणने हे दावे फेटाळून लावले.