गुन्हेगारीवरून मविआ आक्रमक; सरकार बरखास्तीची मागणी करत शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 05:53 PM2024-02-10T17:53:02+5:302024-02-10T17:54:23+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत निवेदन दिलं आहे.
Congress-NCP SP ( Marathi News ) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार, मुंबईत माजी नगरसेवकाची झालेली हत्या आणि पुण्यात सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार बरखास्त करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी आणि लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली. त्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत याच मागणीचं निवेदन दिलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीविषयी माहिती देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, राज्यात ढासळलेली कायदे व्यवस्था आणि यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी करत त्यासंदर्भातील एक निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना आज देण्यात आले."
"राज्यात ढासळलेली कायदे व्यवस्था आणि यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे,"अशी मागणी करत त्यासंदर्भातील एक निवेदन
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 10, 2024
महाराष्ट्राचे राज्यपाल @maha_governor यांना आज देण्यात आले.
यावेळी मा.मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाणजी,काँग्रेस पक्षाचे… pic.twitter.com/eHYoIkwQ92
दरम्यान, राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये आव्हाड यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, नसीम खान तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंनी काय मागणी केली?
महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारला घेरत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "पूर्वी गँगवॉर गुंडांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः गुंडाला पोसतायत अशी माहिती आहे, त्यांनी गुंडांना दूर करायला पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय, त्यावरून आपलं भविष्य या गुंडांच्या हाती द्यायचं का? राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. ताबडतोब निवडणुका घ्या," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.