मविआची निर्णायक बैठक सुरू; सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित: जागावाटपावर आज शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:05 PM2024-03-06T14:05:30+5:302024-03-06T14:07:35+5:30

मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील नेत्यांच्या भूमिकेविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली होती.

Mva leaders decisive meeting on seat sharing Major leaders of all parties present | मविआची निर्णायक बैठक सुरू; सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित: जागावाटपावर आज शिक्कामोर्तब?

मविआची निर्णायक बैठक सुरू; सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित: जागावाटपावर आज शिक्कामोर्तब?

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. महाविकास आघाडीतप्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आला असला तरी अद्याप जागावाटपाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील 'फोर सीझन हॉटेल'मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत मविआतील जागावाटपाचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील नेत्यांच्या भूमिकेविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली होती. तसंच जागावाटप करताना मविआसमोर काही अटीही ठेवल्या होत्या. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी खरंच महाविकास आघाडीत समाविष्ट होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना ६ मार्च रोजी जागावाटपाबाबत चर्चा करू, असं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे.

बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

महाविकास आघाडीतील इतर तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "अद्याप मविआत जागावाटपावरूनच तिढा आहे. १० जागांवर काँग्रेस-शिवसेना यांच्यात चढाओढ आहे. ५ जागा अशा आहेत ज्यावर शिवसेना-काँग्रेस आणि  राष्ट्रवादी यांच्यात ठरणं बाकी आहे. एकंदरीत १५ जागांवर एकमत झालेले नाही. ही आमची माहिती आहे. त्यामुळे मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? हा तिढा त्यांचा आहे. तो तिढा सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना मविआकडून चार ते पाच जागांचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत काही तोडगा निघतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Mva leaders decisive meeting on seat sharing Major leaders of all parties present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.