BJP slams Mahavikas Aghadi: हा कसला मोर्चा, हा तर नुसता थयथयाट... भाजपा आमदाराने मविआला डिवचलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:42 PM2022-12-17T14:42:08+5:302022-12-17T14:42:33+5:30
मविआच्या 'त्या' नेत्यांचा माज उतरल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही
BJP slams Mahavikas Aghadi, मुंबई: संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चाच म्हणावा लागेल अशी बोचरी टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते.
"सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी १२ व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही," असा घणाघात भातखळकरांनी केला.
"छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपाने केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला याबद्दल शिकवू नये. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे," असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रकाश आंबेडकरांकडून शिवसेनेला मोलाचा सल्ला, तर काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर नव्याने पक्षबांधणी करण्याचे आव्हान आहे. त्यानुसार ते विविध पक्षांशी आणि संघटनांशी काही मुद्द्यांच्या आधारावर हातमिळवणी करताना दिसत आहेत. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. वंचित बहुजन आघाडी शिवसेनेच्या ठाकरे गटाला पाठिंबा देणार असे खुद्द प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले. पण सीमावादाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. तसेच शिवसेनेलाही मोलाचा सल्ला दिला आहे. "सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या सोबत जाण्यास तयार आहोत पण राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत जाण्यापेक्षा एकटे लढू, भाजपासोबतही आम्ही जाणार नाही. आता अविकसित गावे शिवसेनेवर आरोप करण्याची शक्यता आहे. कारण ते राष्ट्रवादीचे नाकर्तेपण आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेत आहे?" असे रोखठोक मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.