"उज्ज्वल निकम BJPचे पदाधिकारी"; मविआच्या आरोपावर निकम म्हणाले, "काँग्रेसचे वकील अभिनेत्याला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:53 PM2024-08-21T16:53:06+5:302024-08-21T16:53:55+5:30
Ujjwal Nikam : बदलापूर प्रकरणात ॲड उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
Badlapur School Crime : बदलापुरात १३ ऑगस्ट रोजी दोन चिमरुड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याने राज्यभरातील नागरिक संतप्त आहेत. याप्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी मंगळवारी बदलापूरात मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारनेही तातडीने पावलं उचलत याप्रकरणी एसआयटीची स्थापना केली आणि लवकारत लवकर आरोपपत्र दाखल करण्यात सांगितले आहे. या घटेनचं गांभीर्य पाहता सरकारने बदलापूरच्या अत्याचाराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. मात्र आता निकम यांच्या नेमणूकीला महाविकास आघाडीकडून विरोध होत आहे. त्यावर उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बदलापूर प्रकरणात ॲड उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. घटना घडेलेली शिक्षण संस्था आणि वकील हे एकाच पक्षाशी संबधित आहेत. तर एसआटी, फास्ट ट्रॅक कोर्ट ही फक्त बोलण्याची भाषा आहे. उज्ज्वल निकम हे भाजपचे आहेत ते आता वकील राहिलेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
"या प्रकरणातील आरोपीला चौकामध्ये फाशी द्यायला हवी. संस्था चालकाला समोर आणून त्याचाही तपास केला पाहिजे. घटना घडेलेली शिक्षण संस्था आणि वकील हे एकाच पक्षाशी संबधित नेमण्यात आले आहेत. लोकांनी न्यायाची अपेक्षा काय ठेवायची? त्यांच्यापेक्षा मोठे वकील मिळत नाही का?," असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
"उज्ज्वल निकम हे भाजपचे आहेत ते आता वकील राहिलेले नाहीत. तर ते आता आपलीच लोक तिथे बसवतील. एसआटी, फास्ट ट्रॅक कोर्ट ही फक्त बोलण्याची भाषा आहे, अजून काही नाही," असं संजय राऊत म्हणाले.
माझ्यावर बेछुट आरोप करु नका - ॲड उज्ज्वल निकम
"विरोधी पक्षनेत्यांना या प्रकरणाची किती काळजी आहे हे या प्रकरणावरुन स्पष्ट होतं. जीभेला हाड नसल्याने हे बेछुट आणि बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हेमंत करकरे यांचा मृत्यू २६/११ च्या हल्ल्यातील गोळीबारात झाला होता. असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तरी त्यावर प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधी पक्षनेते आहेत. पण आज असा प्रश्न उपस्थित करुन ते यात राजकारण आणत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. २६/११ वेळी केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार होतं. १९९३ बॉम्बस्फोटात मी खटला चालवत होतो. त्यावेळी त्यांच्या पक्षाचा एका अभिनेत्याला वाचवण्यासाठी आटापीटा चालला होता. मी त्यावेळी दबलो नाही. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत पण माझ्यावर संस्कार असल्याने मी सांगत नाही. त्यामुळे माझ्यावर बेछुट आरोप करु नका. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो निश्चितपणे त्याला कठोर शिक्षा मिळेल याची ग्वाही देतो," असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
"शासनाकडून लेखी आदेश प्राप्त झाले नसले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करुन विनंती केली. सदर घटना अत्यंत गंभीर असल्याने मी त्यांना होकार कळवला. माझं काम पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरु होणार आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. शाळांमध्ये स्वच्छता गृहात नेलं जातं तेव्हा खबरदारी बाळगणं जरुरीचं आहे. शक्ती विधेयकाचे लवकर कायद्यात रुपांतर झालं पाहिजे. पॉक्सो कायद्याअंतर्गत अधिनियम करायला हवेत," असं उज्ज्वल निकम म्हणाले.