मुंबई - शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्यात घडत असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंना फोन करून मनसेचं एक मत भाजपाला देण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे.
उद्या होणाऱ्या बहुमत चाचणी महाविकास आघाडी सोबतच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची कसोटी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारला सभागृहात बहुमत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या बहुमत चाचणीत एक एक मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांना फोन करून मनसेकडील एक मत भाजपाला देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या विनंतीनंतर राज ठाकरें यांनी मनसेकडील एक मत भाजपाच्या बाजूने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे महाविकास आघाडीविरोधात मतदान करतीत.