"माझा २ महिन्यांचा पगार आव्हाडांना, चेक तयार"; आ. मिटकरींचं दुसरं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 09:16 AM2024-02-25T09:16:15+5:302024-02-25T09:51:11+5:30
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनाच मूळ पक्ष आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर, शरद पवार ...
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनाच मूळ पक्ष आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर, शरद पवार यांनी नव्या पक्षाची घोषणा करत चिन्हही मिळवले. शरद पवार यांच्या ''राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार'' या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने २२ फेब्रुवारी रोजी हे चिन्ह पक्षाला बहाल केले. या तुतारी चिन्हाचा लाँचिंग सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावर साजरा झाला. मात्र, या तुतारीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाड हे खिंड लढवत आहेत. तर, अजित पवारांकडून आमदार अमोल मिटकरी त्यांच्या स्टाईलने राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका करत आहेत. त्यातून, मिटकरी आणि आव्हाड यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील 'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी', असं म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यावर, आमदार मिटकरी यांनी आव्हाड यांना चॅलेंज दिलं होतं. जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवावी, १ लाख रुपयांचं बक्षीस देणार, असे मिटकरी यांनी म्हटलं.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडावर तुतारी चिन्हाच्या अनावरण सोहळ्यात तुतारीही वाजवून दाखवली. त्यानंतर, अमोल मिटकरींनी आता चॅलेंज पूर्ण करावं, अशी मागणी होऊ लागली. त्यावर, अमोल मिटकरींनी माध्यमांसमोर येऊन चेक दाखवत भूमिका मांडली.
रायगडावरील आव्हाड यांच्या तुतारीवादनावर बोलताना, ''जितेंद्र आव्हाड यांचं पोट पुढे आलेलं आहे. मागचे तुतारीवादक तुतारी वाजवत आहेत. आव्हाडांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. माझा १ लाख रुपयाचा चेक त्यांच्या नावे तयार आहे. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ तारखेपासून मुंबईत विधान भवनात पार पडत आहे. त्यांनी पहिल्या दिवशी स्वत: तुतारी आणावी. पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांकडून, ज्याला अजित पवार यांनी ५० हजार रुपये महिन्यावर ठेवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता सोशल मीडियावर मिटकरी यांनी लिहिलेला चेक व्हायरल होत असून यात काहीजण मिटकरींची हुशारी म्हणतात. तर, काहीजण मिटकरींना नीट चेकही लिहिता येत नाही, असे म्हणतात. कारण, मिटकरींनी चेकमध्ये रक्कमेच्या जागी नाव आणि नावाच्या जागी रक्कम लिहिली आहे.