मुंबई - भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी, राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन, विधानसभेनंतरचा सत्तासंघर्ष आणि विरोधकांच्या राजकारणाबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपल्याला सत्ता आणि पदाचा गर्व किंवा दर्प होता, अशी टीका शरद पवार यांनी केली. यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मी 5 वर्ष जनतेसाठी काम केलं. 5 वर्षात मी घरच्यांना अजिबात वेळ दिला नाही. त्यामुळे, उन्माद, गर्व असं काहीही, उलट निवडणुकीचा निकाल पाहिला तर जनादेश भाजपला आहे. अनैसर्गिक युती, त्यांनी केलीय, पण जनतेचं बहुमत तर आम्हाला आहे, असे म्हणत महाविकास आघाडीला देवेंद्र यांनी टोला लगावला.
तुम्ही राष्ट्रवादीचा पाया ढिसाळ केला, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमकुवत केलं. म्हणून पवारांनी तुमच्यावरील राग काढला का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिलं. लोकसत्ता डॉट. कॉमला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी, शरद पवारांनी माझ्यावर ज्याप्रमाणे टीका केली, त्यावरुन नक्कीच मी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चं स्थान निर्माण केलंय, असे म्हटलं आहे.
मी काय केलं, काय नाही केलं. मी नेता झालो की नाही झालो, लोकं मला किती मानतात, की नाही मानत. पवारसाहेब हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत. पण प्रत्येकवेळी, थेट तर ते करु शकत नाहीत. पण इन्डायरेक्टली माझ्या जातीची आठवण त्यांना करुन द्यावी लागते हेच माझे यश आहे. दुसऱ्या गोष्टीची नाही, माझ्या जातीची आठवण त्यांना करुन द्यावी लागते. मी ब्राह्मण आहे ना, दुनियाला माहितीय मी ब्राह्मण आहे म्हणून. नुकतेच काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी इन्डायरेक्टली पुन्हा माझ्या जातीची आठवण करुन दिली. पण, लोकांनी मला आहे तसं स्विकारलंय.
मला खरोखर असं वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणात मी निश्चितच काहीतरी स्थान मिळवलंय, अन्यथा वारंवार आडून आडून.. मी कोणत्या जातीचाय हे सांगण्याची गरज निदान पवारसाहेबांना तरी पडली नसती. आमच्या विरोधकांची आयुध ज्याक्षणी संपतात, तेव्हा ते जातीवर येतात. ठीकंय ते, माझं असं म्हणणं आहे की, जात नेत्यांच्या मनात असते, जनतेच्या नसते, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील आपलं स्थान सांगितलं. तसेच, जातीचं राजकारण जनतेला मान्य नसल्याचंही त्यांनी सूचवलंय.