मुंबई : मुलुंड विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार आणि खासदार यांच्यातील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. मर्जीतल्या एकाही उमेदवाराला संधी न दिल्यामुळे माझा पत्ता कट करण्याचा डाव आखला जात असल्याचा थेट आरोप आमदार सरदार तारासिंग यांनी केला आहे. ‘मुलुंडमध्ये एवढी वर्षे काम केले. भाजपाचा गड राखला. मात्र माझ्या एकाही उमेदवाराला जागा दिली नाही. खासदारांच्या मर्जीतल्याच उमेदवारांची वर्णी लागली’, अशी खंत आमदारांनी व्यक्त केली. तर उमेदवारीवरून तारासिंग यांच्या गटातूनही नाराजीचा सूर उमटत आहे. तर भाजपा उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळेसही गैरहजर राहत आमदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचा परिणाम उमेदवारांच्या मतांवर पडू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनीही खासदारांविरुद्ध राग व्यक्त करत भाजपा ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. आपण संघाचे कार्यकर्ते आहोत, मात्र खासदारांचे कार्यकर्ते नसल्यामुळे आपल्याला डावलल्याचा आरोप दहितुले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
माझा पत्ता कट करण्याचा डाव - सरदार तारासिंग
By admin | Published: February 04, 2017 4:22 AM