मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे,’ असा दावा केतकीने याचिकेद्वारे केला आहे. शुक्रवारी ही याचिका न्यायालयापुढे सादर करण्याची शक्यता आहे.शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १४ मे रोजी ठाणे पोलिसांनी अटक केली. ‘कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मला अटक करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवावी, अशी मागणी केतकीने याचिकेद्वारे केली आहे. केतकीला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तिला सीआरपीसी ४१(ए)अंतर्गत नोटीस देऊन चौकशी अधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहण्यास सांगायला हवे होते, असा युक्तिवाद केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी न्यायालयात केला. तिला नोटीस पाठविण्याऐवजी पोलिसांनी फोन करून पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले. कायद्याचे पालन करणारी नागरिक असल्याने तिने पोलिसांचे म्हणणे ऐकले. पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांनी मला अटक केली. कुणीतरी केलेली कविता तिने पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये शरद पवार यांचे नाव नव्हते, असा युक्तिवाद देशपांडे यांनी न्यायालयात केला.
केतकी चितळेवर एकूण २० गुन्हेशरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकीवर २० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याआधीही तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तपासाला स्थगिती देण्याची मागणी तिने केली होती. मात्र, तिच्यावर अन्य गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. तिच्या आधीच्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे.