Join us

"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 2:16 PM

माझी लढाई आदित्य ठाकरेंसोबत नाही. माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य यांच्यासोबत होणाऱ्या तुलनेवर थेट उत्तर दिलं.

मुंबई

माझी लढाई आदित्य ठाकरेंसोबत नाही. माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य यांच्यासोबत होणाऱ्या तुलनेवर थेट उत्तर दिलं. अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत डॉट कॉम'ला दिली. यावेळी, लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांच्या प्रश्नांना त्यांनी 'मनसे' उत्तरं दिली.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या तुलनेबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिलं. ते म्हणाले, "मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे. मला शेवटी राज साहेबांपर्यंत पोहोचायचं आहे. मग मी १० टक्के पोहोचलो तरी चालेल. पण माझी खरी लढाई ती आहे. दोन नेत्यांची मुलं म्हटलं तर तुलना वगैरे सगळं चालणार. पण ते काही माझ्यासाठी महत्वाचं वाटत नाही", असं अमित ठाकरे म्हणाले. 

अमित ठाकरे मनसेकडून यंदा माहिम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्याशी असणार आहे. माहिममध्ये ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. 

...म्हणून राजकारणात आलो"मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो हे मी अनेकदा बोललोय. जाणीवपूर्वक बोलतोय कारण राजकारणातली सध्याची परिस्थिती पाहून मला राजकारणात यावसंच वाटलं नसतं. पण आपल्या देशाकडे तरुणांची ताकद आहे. जी जगात इतर कोणत्याच देशाकडे नाही. आपल्याकडे तरुणांची इतकी ताकद आहे की आपण जगाला हरवू शकतो. त्यामुळे आपल्याकडील तरुणांना कळलं पाहिजे की आपली ताकद काय आहे आणि आपण काय करु शकतो. यासाठीच तरुणांचा आवाज म्हणून राजकारणात आलो", असं अमित ठाकरे म्हणाले.

टॅग्स :अमित ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबईआदित्य ठाकरे