लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छायाचित्रकार-शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंबानींच्या दुहेरी हत्येचा कट रचल्याबद्दल दोषी ठरलेला आरोपी चिंतन उपाध्याय याला दिंडोशी सत्र न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले त्यावेळी आपली सदसदविवेकबुध्दी जागृत असून मी कोणताही गुन्हा केलेला नाही असा युक्तिवाद चिंतनने न्यायालयात केला.
दुहेरी हत्येचा कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चिंतन सह इतर आरोपी विजय राजभर, प्रदीप राजभर तसेच शिवकुमार राजभर या तिघांना न्यायालयात सादर करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी चिंतन याने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, याप्रकरणी आपण दयेची याचना करीत नसून न्यायालयाने आपल्याला दोषी ठरविले आहे. त्यामुळे सुनावण्यात येईल ती शिक्षा स्वीकारण्यास आपण तयार आहोत. असे चिंतनने सांगितले चिंतन सह इतर आरोपींनी सुद्धा युक्तिवाद करत दयेची मागणी केली. न्यायालयाने सर्वांचे युक्तिवाद ऐकून घेत याबाबतची सुनावणी १० ऑक्टोबर रोजी ठेवली.
सर्व आरोपींना फाशी द्या
पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी चिंतनचा युक्तिवाद तो गुन्हा मान्य करीत असल्याचे दर्शवतो. सर्व आरोपी या गुन्ह्यात स्वेच्छेने सहभागी झाले होते. समाजाचा एक महत्त्वाचा स्तंभ असलेल्या वकिलावरील हल्ल्याचा विचार करता कोणाचीही गय केली जाणार नाही, असा संदेश समाजात जाणे गरजेचे आहे, सर्व आरोपींनी शांत डोक्याने हत्येचा कट रचला त्यामुळे सर्व आरोपींना फाशींची शिक्षा देणे गरजेचे आहे.