माझ्या मुलीचा जीव गेला, बिल्डरचा टॉवर मात्र दिमाखात उभा कसा? सेक्रेटरीनं कथन केली आपबिती
By संतोष आंधळे | Published: October 7, 2023 08:18 AM2023-10-07T08:18:41+5:302023-10-07T08:23:54+5:30
पिण्याचे पाणी १५ वर्षांपासून नाही. लिफ्ट कधी चालू असते, कधी बंद असते.
संतोष आंधळे
मुंबई : माझा जन्म या ठिकाणी झाला आहे. २००६ ला आम्हाला बिल्डरने या इमारतीत पाठविले. तेव्हापासून आमची दुर्दशा सुरू आहे, ती आजपर्यंत! पिण्याचे पाणी १५ वर्षांपासून नाही. लिफ्ट कधी चालू असते, कधी बंद असते.
आमच्या जागेवर आम्हाला इमारत बांधून दिल्यावर बिल्डरने त्या ठिकाणी खासगी इमारत बांधली आहे. तो टॉवर आज दिमाखात उभा आहे. त्या ठिकाणी सर्व सुखसोयी आहेत. आम्हाला मात्र पाठविले खुराड्यात आणि स्वतः मात्र मस्त आनंदाने राहात आहे. गरिबाचा कुणी वाली नसतो हेच खरे आहे. राजकारणी आज भेटायला आली, उद्या कुणी इकडे फिरकणार पण नाही. ना आम्हाला कोणत्या चांगल्या सुविधा मिळतील. ही व्यथा वेदना जय भवानी एसआरए इमारतीचे सेक्रेटरी संजय चाैगुले यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.
ते म्हणाले, मी त्या इमारतीचा सुरुवातीपासून सेक्रेटरी आहे. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत; पण कुणाला आम्हाला मदतच करायची नाही आहे, हे माझ्या लक्षात आले.
यापूर्वीच कधीच आमच्या इमारतीला आग लागली नव्हती. ही पहिली वेळ आहे. पहाटे अडीच ते तीन वाजेपासून आग लागल्याची कुणकुण लागली. माझी पहिल्या मजल्यावर दोन घरे आहेत. माझी आई बाजूच्या रूममध्ये होती, तर मी, माझी बायको, मुलगा, मुलगी एका रूममध्ये होतो. आगीची माहिती मिळताच आम्ही सगळे जागे झालो. मजल्यावर धूर आणि अंधार होता. आईला आणि मुलीला म्हटलं चला, त्यावेळी आई चप्पल घालायला समोरच्या रूममध्ये गेली. तोपर्यंत मी आणि माझा मुलगा तेजस खाली आलो. मात्र, मजल्यावर थांबलेल्या आई, मुलगी आणि बायकोच्या नाकातोंडात धूर गेला. यामुळे माझी १७ वर्षांची मुलगी तिशा हिचा मृत्यू झाला. बायको संजना (लक्ष्मी) आणि आई आक्काताई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयात ऑक्सिजनवर आहेत, हे सांगताना ते आपल्या भावना राेखू शकले नाहीत.
‘तिचे’ इंजिनीअर व्हायचे स्वप्न अपूर्णच राहिले
माझी मुलगी तिशा हिचा आगीत मृत्यू झाला. ती तेरावीला होती, सायन्स शाखेत शिकत होती. तिचे इंजिनिअर व्हायचे स्वप्न अपूर्ण राहिले. सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला. सरकार काय भरून देणार आहे माझी मुलगी! ज्याची मुलगी जाते, त्याचे दुःख काय असते हे कुणालाच कळणार नाही.
पाण्याची कायम बोंबाबोंब
सध्या जी इमारत उभी आहे त्या ठिकाणी जय भवानी नावाची मोठी झोपडपट्टी होती. झोपटपट्टी पुनर्वसन योजनेतून आम्हाला सात मजल्यांची इमारत बांधून देण्यात आली. या इमारतीच्या एका मजल्यावर नऊ रूम आहेत. लिफ्ट आहे; पण नावापुरतीच. ५०० रुपये महिन्याला भाडे आहे, मात्र पाण्याची बोंबाबोंब आहे. आम्ही बाहेरून पाणी आणतो.