माझी दिवाळी : एका दिवाळीत तर माझ्या हातातच फुटला होता सुतळी बॅाम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:54 AM2024-10-28T10:54:50+5:302024-10-28T11:00:11+5:30

मुंबईत तीन दशकांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. एलईडी लाईट्समुळे शहरातील दिवाळी चकचकीत झाली आहे.

My Diwali: In one Diwali, a twine bomb burst in my hand - Makarand Anaspure  | माझी दिवाळी : एका दिवाळीत तर माझ्या हातातच फुटला होता सुतळी बॅाम्ब

माझी दिवाळी : एका दिवाळीत तर माझ्या हातातच फुटला होता सुतळी बॅाम्ब

- मकरंद अनासपुरे 
(अभिनेता)

यंदाच्या दिवाळीत रसिकांसाठी विशेष भेट घेऊन आलो आहे. माझ्या नऊ व्यक्तिरेखा असलेला ‘मूषक आख्यान’ हा मराठी चित्रपट दिवाळीनंतर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर प्रथमच नऊ भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे दिवाळीचा फराळ जिरवण्यासाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी घेऊन आलो आहे. ८ नोव्हेंबरपासून हा चित्रपट सर्वांनी आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन पाहावा असे आवाहन करतो. याखेरीज विधानसभेची निवडणूक असल्याने योग्य उमेदवारालाच निवडून द्यावे, यातच आपले भले असल्याचे मतदारांनी लक्षात घ्यावे.

पैठण तालुक्यात बिडकीन माझे गाव आहे. तिथल्या दिवाळीच्या आठवणी मनात आजही ताज्या आहेत. दिवाळीत आम्ही आजोबांच्या घरी जमायचो. खूप भावंडे एकत्र येऊन खूप खेळायचो, मजा करायचो. एक प्रकारचे ते सोशल गॅदरिंगच असायचे. त्या काळात गॅझेट्स वगैरे नसल्याने एकमेकांशी स्नेह असलेली दिवाळी असायची. कडाक्याच्या थंडीत नरक चतुर्दशीला पहाटे उठून कुडकुडत अभ्यंग स्नान करायचो. ऊन यायची वाट पाहून सकाळच्या उन्हात बसायचो. फराळाच्या पदार्थांवर ताव मारायचो. सर्व मुले गावभर हिंडून खूप धिंगाणा करायचो. त्या काळी ऋतूमानही खूप वेळापत्रकाप्रमाणे असायचे. थंडीच्या काळात पाऊस नव्हे, तर थंडीच पडायची. त्यामुळे वातावरण खूप छान असायचे. विशेष म्हणजे दिव्यांची दिवाळी असायची.

सधन-संपन्नता खूप नव्हती, पण मनाची श्रीमंती खूप मोठी होती. दिवाळीला नवीन कपडे घालून नातेवाइकांकडे जाऊन फराळ करायचो. आमच्या भागात करंज्या आणि कडबोळ्या खूप प्रसिद्ध आहेत. या जोडीला चकली, शेव, अनारसे बनवताना येणारा घमघमाट अजूनही आठवतो. जवळपास पंधरवडाभर खूप मजा यायची. आकाशकंदील बनवताना नवनवीन प्रयोग केले जायचे. फटाके संपल्यावर न वाजलेले फटाके फाडून त्यातील दारू एकत्र करून ती पेटवायचो. एकदा माझ्या हातातच सुतळी बॅाम्ब फुटला होता. तेव्हापासून वाजणाऱ्या फटाक्यांपासून दूर राहिलो. फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणम समजू लागल्यावर ते वाजवणे बंदच केले. आता फटाक्यांचा मोह राहिला नाही, पण भेटीगाठींचा मोह आवरता येत नाही.

मुंबईत तीन दशकांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. एलईडी लाईट्समुळे शहरातील दिवाळी चकचकीत झाली आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा खूप असल्या तरी बिल्डिंग्जची संख्या खूप वाढली आहे. आडव्या असलेल्या चाळी टॅावरच्या रूपात उभ्या झाल्या आहेत. कुटुंबांची संख्या वाढली, पण रस्ते मोठे झाले नाहीत. त्यामुळे फटाके रस्त्यावर वाजवले जातात. याचा वाहतुकीला अडथळा होतो व दुचाकीस्वारांच्या जिवाला धोका निर्माण होतो. काहीजण मुद्दाम रात्री उशिरा मोठा आवाज करणारे फटाके वाजवतात. त्यांना समजावण्यात काही पॅाईंट नसतो. दिवाळीतील रोषणाई नेत्रसुखद वाटते, पण फटाक्यांचा आवाज त्रासदायक ठरतो. शहरात तयार फराळ मिळत असल्याने बनवण्यासाठी त्रास घेतला जात नाही. एकमेकांना दिली जाणारी गिफ्टस दुकानात सहज मिळत असल्याने शहरी दिवाळी खूप फॅार्मल झाली आहे असे वाटते. 

आताच्या दिवाळीत स्नेहाचा ओलावा कितपत राहिला याबाबत शंका येते. तरीही नवीन पिढी हा महत्त्वाचा सण आनंदाने साजरा करते. माझ्या पत्नीने मुलांना कंदील बनवायला शिकवला आहे. इतकी वर्षे ठाण्यातील दिवाळी बघितली. आता दादरकर  झाल्याने येथील पहिली दिवाळी साजरी करणार आहे. दिवाळीचे साहित्य मराठी बांधवांकडूनच खरेदी करण्याचा माझा कल असतो. शहरांमध्ये दिवाळी पहाट होते, पण गावाकडे असे काही नसायचे. गावी रेडिओवर गाणी लागायची तीच दिवाळी पहाट होती. मुंबईत मात्र कोणत्याही नाट्यगृहात जाऊन दिवाळी पहाट कार्यक्रम बघता येतो. शहरामध्ये मनोरंजनाची साधने खूप वाढली आहेत. पूर्वी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये टीव्हीही नव्हता. अशी बदललेली दिवाळी मी अनुभवली आहे. 

Web Title: My Diwali: In one Diwali, a twine bomb burst in my hand - Makarand Anaspure 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.