Join us

शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी ‘माझी वसुंधरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर पर्यावरण व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग काम करत आहे. निसर्गाच्या पंचतत्त्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही. जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

हे अभियान ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अमृत शहरे ४३, नगरपरिषदा २२६, नगरपंचायती १२६, दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या २४६ ग्रामपंचायती व रायगड, रत्नागिरी व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती नसल्याने या जिल्ह्यात ही अट शिथिल करून पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. अभियान राबविण्यासाठी महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदांचे / नगरपंचायतींचे मुख्याधिकारी व ग्रामसेवक यांना जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यांच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख म्हणून संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित महसुली विभागाचे प्रमुख म्हणून विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या विभागातील/जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून अभियानात उच्चतम कामगिरी करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव वर्षात प्रारंभ

माझी वसुंधरा अभियान उपक्रमाचे संकेतस्थळ १ जानेवारी २०२१ रोजी सुरू होणार आहे. नवीन वर्षात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची एक तरी शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शपथ घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट देऊन शपथ घ्यावी. संकेतस्थळावर शपथेचे पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायाव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळीवर अन्य कोणतीही शपथ घेता येऊ शकणार आहे. शपथ घेतल्यानंतर प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. दरम्यान, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ई प्लेज उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वर्षा निवासस्थानी दूरचित्रप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आला आहे.