'माझं शिक्षण ZP च्या शाळेत झालं, आई एसटीमधून डबा पाठवायची'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:48 PM2020-03-07T16:48:24+5:302020-03-07T16:56:24+5:30
जानेवारी 1995 मध्ये मुंबईच्या छोट्या वस्त्यांमधून बालवाडी पातळीवर काम सुरू करणाऱ्या या संस्थेने आज सर्वदूर
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहातील प्रथम शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भावना व्यक्त केल्या. तसेच, मीही जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिकल्याची आठवण त्यांनी आपल्या भाषणातून करून दिली.
जानेवारी 1995 मध्ये मुंबईच्या छोट्या वस्त्यांमधून बालवाडी पातळीवर काम सुरू करणाऱ्या या संस्थेने आज सर्वदूर आपले शिक्षणप्रसाराचे कार्य पोहचवले आहे. प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, बाल संरक्षण या कार्यक्रमांद्वारे संस्थेची व्याप्ती देशभर झाली आहे. या कामाचे विशेष कौतुक आहे.
''माझं स्वतःचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं, आधी घरात कोणी विशेष शिकलेलं नव्हतं, पण माझ्या आईला शिक्षणाबाबत खूप आस्था होती, त्यामुळे नंतरच्या पिढ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळालं. आम्ही सातही भावंडं शिकलो.. आई आमच्यासाठी एसटीमधून डबा पाठवायची, तसेच आम्ही नीट शिकतो आहोत ना हे पाहण्यासाठी स्वतः जातीने यायची, हे शिक्षणाचे संस्कार पहिल्यापासूनच आमच्यावर झाले.. त्यामुळे आम्ही कुठल्याही क्षेत्रात काम केलं तरी शिक्षणक्षेत्रासाठी काम केलं पाहिजे, हे सदैव मनात असतं.'', असे म्हणत शिक्षण क्षेत्राबद्दलची आस्था पवार यांनी बोलून दाखवली.
शिक्षणाच्या कामात आगळंच समाधान मिळतं, आईचे शिक्षणाचे बाळकडू आहेच, शिवाय प्रतिभावंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे.पी.नाईक आणि चित्रा नाईक यांचेही योगदान आहे. मी शिक्षणमंत्री असताना चित्राताई शिक्षण संचालक होत्या, त्या दोघांचे कार्य बघून मी त्यांच्याशी कधीही मंत्री म्हणून वागलो नाही, शिक्षण विभागासाठी त्यांची आस्था मला नेहमीच भावली. प्रथम शिक्षण संस्थाही आज त्याच पद्धतीने समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी हिरीरीने काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहचवण्याचा संस्थेचा मानस आहे. हे काम त्यांनी असेच अखंडपणे करत राहावे, संस्थेला या कामात आम्ही नेहमीच साथ देऊ असे म्हणत पवार यांनी संस्थेला शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, शरद पवार यांच्या बालपणीचे आणि शालेय जीवनातील अनुभव ऐकताना उपस्थित लोकंही एकरुप झाले होते.