मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणाऱ्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या आर मध्य(बोरिवली) व आर उत्तर(दहिसर) या पालिकेच्या दोन वॉर्ड मधील अभियानाचा शुभारंभ आज सकाळी बोरिवली पश्चिम येथील आर- मध्य वॉर्डच्या कार्यालयात शिवसेना विभागप्रमुख - आमदार विलास पोतनीस व परिमंडळ 7 चे महापालिका उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
"माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे अभियान आर मध्य व आर उत्तर वॉर्ड मध्ये दि,१५ सप्टेंबर ते दि,२५ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार असून या मोहिमेत प्रत्येकी २ वेळा घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व जनजागृती करणार आहेत अशी माहिती आमदार पोतनीस यांनी लोकमतला दिली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळावयाच्या सूचना व कोव्हिड योद्ध्याचा ठेवायचा सन्मान या संबंधी उपस्थितांना आमदार विलास पोतनीस यांनी प्रतिज्ञा देवून तसेच कोरेना विषयीच्या जनजागृतीच्या पुस्तिकेचे प्रकाशन करुन योजनेचा शुभारंभ केला.
शिवसेना विभाग क्र १ तर्फे कोरोना विरोधातील मोहिम प्रभावीपणे राबविली जाणार असून प्रशासनाच्या आरोग्य दूतांबरोबर शिवसेनेचे कोव्हिड योद्धे घरोघरी जाऊन जनजागृतील करतील असे प्रतिपादन शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांनी केले.
दहिसर, बोरिवली विभागात उत्तुंग इमारतींमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांबरोबर संपर्क सुरु केला असून पत्रके, घरोघरी जाऊन संपर्क करुन मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, हातांची स्वच्छता राखणेे याबाबत माहिती देतील अशी माहिती आमदार पोतनीस यांनी दिली.
याप्रसंगी विधी व महसूल समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद, नगरसेवक संजय घाडी, नगरसेवक हर्षद कारकर , नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर,नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेविका सुजाता पाटेकर, नगरसेविका गीता सिंघण, नगरसेविका माधुरी भोईर , आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे, आर उत्तर वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर , महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.