Join us

माझे कुटुंब, माझी जबाबदार मोहिम मुंबई उपनगर जिल्ह्यात गतिमान करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 6:37 PM

उपनगर पालकमंत्री  आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. सर्वांच्या सहभागातून मुंबई उपनगर जिल्ह्यात ही मोहीम अधिक गतिमान करण्यात यावी, अशा सूचना उपनगराचे पालकमंत्री. आदित्य ठाकरे यांनी आज उपनगर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

पालकमंत्री  ठाकरे यांनी या मोहीमेच्या अनुषंगाने आज वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुसरी आढावा बैठक घेतली. बैठकीला उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह उपनगर जिल्ह्यातील महापालिका उपायुक्त, सर्व १५ वॉर्डांचे सहायक आयुक्त यांच्यासह आरोग्य, आयसीडीएस, सहकार आदी संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री  म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहीमेचा हाच मुख्य उद्देश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करण्यात यावी. प्रत्येक इमारतीमध्ये गृहभेटींचे नियोजन करावे. दैनंदिन नियोजन करुन सर्वांनी मोहिमेवर लक्ष केंद्रीत करावे. जनजागृतीसाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावणे, लोकांना माहितीपत्रकांचे वाटप करणे यावरही भर देण्यात यावा. चालू आठवड्यात मोहीम वेगात राबवून अधिकाधिक गृहभेटी पूर्ण होतील असे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. 

या मोहिमेत हाऊसिंग सोसायट्या आणि अंगणवाड्यांचा सहभाग घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. संबंधीत विभागांशी चर्चा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.  

जिल्ह्यात कोरोनासाठी उपलब्ध असलेला औषधांचा साठा, ऑक्सीजनची व्यवस्था, जंबो सेंटर्स, रुग्णवाहीका, उपलब्ध खाटांची संख्या, आयसीयू खाटांची संख्या याची माहितीही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतली. जिल्ह्यात ऑक्सीजन, औषधे, रुग्णवाहीका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

उपनगर जिल्ह्यातील झोन क्रमांक ३ ते ७ मधील सर्व १५ वॉर्डांचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी, शारीरिक तापमान, लक्षणे तपासत आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयीत रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येत आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबईमुंबई महानगरपालिका