मुंबई – बालवयात जेव्हा बहिष्कृत शब्दाचा अर्थही माहिती नव्हता तेव्हा भाई जगपात यांच्या कुटुंबाला समाजानं बहिष्कृत केले होते. याच घटनेमुळे भाई जगतापांच्या स्वभावात बंडखोरी वृत्ती तयार झाली. लहानपणी घडलेली घटना नकळत मनावर परिणाम करून गेली असा उलगडा काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. लोकमतच्या फेस टू फेस मुलाखतीत ते बोलत होते.
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी भाई जगतापांची मुलाखत घेतली. तेव्हा ते म्हणाले की, मी तिसरी असताना आमच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं होतं. मी कुणाला हाक मारली तरी मला प्रतिसाद द्यायचे नाहीत. मी वडिलांना विचारला तेव्हा त्यांनी हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण वारंवार माझ्यासोबत असं घडल्यावर मी वडिलांना विचारलं तर त्यांनी आपल्या कुटुंबाला बहिष्कृत केल्याचं सांगितलं. बहिष्कृत या शब्दाचा अर्थही मला माहित नव्हतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वडील अध्यक्ष होते. बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडे आहे. ते जगासमोर यावं म्हणून वडिलांनी पुढाकार घेतला. परंतु त्यामुळे लोकांनी आमच्या कुटुंबाला बहिष्कृत केले होते. बालवयात हे पटकन लक्षात आलं नाही पण बालमनावर त्याचा परिणाम झाला. हे असं का? हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बंडखोर वृत्ती माझ्यात आली असं त्यांनी सांगितले.
सिद्धार्थ कॉलेजला प्रवेश घेतला
७ वी पर्यंत मी चांगला विद्यार्थी म्हणून पुढे होते. पण ८ वीत पहिल्या बेंचवर बसलो होतो. इंग्लिशच्या शिक्षिका वर्गात आल्या त्यांनी फळ्यावर जे लिहिलं होतं ते वाचायला सांगितले. मला इंग्लिश येत नव्हतं. तेव्हा शिक्षिकेने थाडकन् माझ्या कानशिलात लगावली. ८ वी वर्गात मी प्रमोट झालो होतो. ज्या भाषेने मला मार खावा लागला. त्यामुळे पुढील वर्षात इंग्शिल, गणित विज्ञानात मी पहिला आलो होतो. बऱ्यापैकी मी इंग्लिश बोलतो. लहानपणी बालमनावर जो आघात झाला त्याने मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकायचं ठरवलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक संस्था निर्माण केली. म्हणून मी तिथे गेलो.
माझं लग्न फिल्मी स्टाइलनं झालं
१९८८ मध्ये माझं लग्न झालं. हे लग्न फिल्मी स्टाईलनं झालं होतं. मी एका कॉलेजचा ट्रस्टी म्हणून कार्यक्रमाला गेलो होते. तिथं एक मुलगी स्टेजवर परफॉर्म करत होती. त्यानंतर मी त्या मुलीची माहिती काढली तेव्हा तीदेखील नात्यातील निघाली. तिचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी होते. लग्नासाठी आमचं बघणं-बोलणं झालं. पण त्यादरम्यान कुणीतरी माझ्याबद्दल तिच्या वडिलांना सांगितले की मी बारमध्ये पडलेला असतो. दारु पितो. पण मी आजपर्यंत कधीही दारु प्यायली नव्हती. मग लग्नात अडथळा आला. परंतु मी दापोलीत तिला भेटायला जायचो. तिच्यावर घरातून लग्नासाठी बंधनं येत होती. आपण लग्न करूया असं मी तिला सांगितले. ती दापोलीहून मुंबईला आली होती. तिला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी ३ दिवस बाकी होते. त्यानंतर १८ वर्ष पूर्ण होताच घरातच पुजारी, रजिस्ट्रार बोलावून लग्न पार पडलं असा किस्सा भाई जगतापांनी सांगितला.
सफरचंद आणि चिकू खाणं सोडलं
बायको माझी पाठराखण झाली. मुलांच्या शाळेत मला कधी जाता आलं नाही. तीने यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली. माझी बायको आमच्या घरची प्रमुख आहे. दरवर्षी २० दिवस कुटुंबासाठी काढायचा असा माझा मानस होता. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जातो. माझी मोठी मुलगी जन्मली तेव्हा मी तिला ३ महिन्यांनी जवळ घेतलं. ती खूप गोरीगोमटी होती. जेव्हा मी तिच्या गालाला हात लावला तेव्हा गाल लाल झाले. तेव्हा मी सहज म्हटलं अरे, ही सफरचंदासारखी दिसते. मग जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जात होतो तेव्हा एकदा सफरचंद घेतलं. तेव्हा मित्र म्हणाला, अरे मुलीला सफरचंद म्हणतो आणि तेच खातो. ती गोष्ट माझ्या मनाला लागली. तेव्हापासून मी सफरचंद खाणं सोडून दिलं. त्यानंतर एकदा लहान मुलगी म्हणाली तुम्ही ताईसाठी सफरचंद सोडलं मग माझ्यासाठी काय सोडणार? तेव्हा मी म्हटलं तू सांग काय सोडू. तेव्हा ती पटकन् म्हणाली चिकू. चिकू हा माझा आवडता पदार्थ पण मुलीसाठी सोडावं लागलं. आजतागायत मी चिकू, सफरचंद खाल्लं नाही असंही भाई म्हणाले.