मला सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र; मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू होताच राऊत यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 09:14 PM2024-03-19T21:14:52+5:302024-03-19T21:28:26+5:30
खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं एक जुनं व्यंगचित्र शेअर करत उपरोधिक शब्दांत हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने मनसे-भाजप युतीची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं एक जुनं व्यंगचित्र शेअर करत उपरोधिक शब्दांत हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचारमोहीम राबवली होती. जाहीर सभांमधून राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत होते. तसंच आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही ते मोदींना लक्ष्य करत असत. नरेंद्र मोदींकडून भारताच्या प्रजासत्ताक व्यवस्थेला धोका असल्याचं सांगत राज यांनी एक व्यंगचित्र रेखाटलं होतं. तेच व्यंगचित्र आज संजय राऊत यांनी शेअर केलं आहे.
राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींवर टीका करणारं व्यंगचित्र शेअर करत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र! रिअली ग्रेट...चित्रकार...सुप्रसिद्ध...होऊ दे चर्चा," अशा शब्दांत राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अप्रतिम!
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 19, 2024
अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great.
चित्रकार...सुप्रसिद्ध...
होऊ दे चर्चा!!!@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@narendramodi@AUThackeray@sardesairajdeep@RajThackeraypic.twitter.com/47ZKHcAqor
मनसे-भाजप युतीबद्दल काय म्हणाले बाळा नांदगावकर?
दिल्लीतील भेटीगाठींनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत भाष्य केलं आहे. "मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो," अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.