मुंबई - मुंबई शहर जिल्हयातील दोन लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली असुन एकुण 30 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सोमवार दि. 29 एप्रिल 2019 होणाऱ्या मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज असुन प्रत्येक नागरिकाने मतदान करुन लोकशाहीचा या राष्ट्रीय उत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे. तसेच नवमतदारांसाठी माय फर्स्ट व्होट सेल्फी हा अभिनव उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मुंबई शहर जिल्हयातील अंतिम उमेदवारांबाबत तसेच प्रशासनाच्या तयारी बाबत माहीती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवाजी जोंधळे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम व जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत बोरकर उपस्थित होते.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या लोकसभा निवडणूक २०१९ राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज या लोकराज्यच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराथी या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
30- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 17 तर 31- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती तयारी प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे. 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द झालेली यादीनुसार 24 लाख 56 हजार 497 मतदार होते. त्यात 42 हजार 437 नव्याने भर पडली. तसेच 215 अनिवासी भारतीयांची (NRI) नावे नोंदली गेली आहेत.
मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मंदीर, रेल्वे स्टेशन, उदयाने, एस.टी. डेपो अशा सार्वजनिक ठिकाणी VVPAT चे प्रात्यक्षिक, जनजागृतीरॅली, प्रसिध्दी मोहिम राबविण्यात आली आहे. पत्रकारांसाठी तसेच न्यायालय अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी देखील VVPAT चे प्रात्यक्षिक करण्यात आले. आतापर्यंत जनजागृती कार्यक्रमात 2.5 लाख मतदारांनी सहभाग घेतला. स्वयंसेवी संस्थाकडुन जनजागृतीकरीता पथनाट्य करण्यात येत आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान युवा मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्टॅन्डी, होर्डीग्स लावण्यात येत आहेत. नवमतदारांसाठी माय फर्स्ट व्होट सेल्फी उपक्रम राबविण्यात येत असुन पहिल्यांदा मतदान केल्यानंतर आपला सेल्फी शेअर करावा. सर्वोत्कृष्ट सेल्फीला पारितोषिक देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सी-व्हीजील ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत जागरुक नागरिकांनी 83 तक्रारी दाखल केला असुन 82 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. भरारी पथक तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत जवळपास 9.36 कोटी रक्कम संशयीत म्हणून पकडली गेली आहे. त्याबाबत सविस्तर कार्यवाही सुरू आहे.
मुंबई शहर जिल्हयात सर्वांनी आदर्श आचार संहितेचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.