मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पहिल्यांद दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर तोफ डागली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात परखडपणे भूमिका स्पष्ट केली. तसेच, आगामी निवडणुका आपण भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं सांगितलं. तर, भाषणाच्या शेवटी शरद पवारांना उद्देशून आम्हाला आशीर्वाद देण्याचे आणि समर्थन देण्याची विनंतीही अजित पवारांनी केली. अजित पवारांनी आपल्या भाषणात शरद पवार यांना आदरातिथ्य मानत असल्याचे सांगत त्यांच्यावरच परखडपणे टीका केली.
जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आम्ही सगळे बंगल्यावर चर्चा झाली. वरिष्ठांना सांगितले सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील बैठकीत होते. कुठली खाती, पालकमंत्री पदे ठरली. निरोप आला, दिल्लीत बोलावले. वरिष्ठांसोबत बैठक झाली. २५ वर्षाचा आमचा मित्रपक्ष त्याला आम्ही सोडणार नाही असं भाजपाने सांगितले. शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा असे सरकार राहील असं भाजपाच्या वरिष्ठांनी सांगितले. तेव्हा शिवसेना नको, ती जातीयवादी आहे असं आमच्या वरिष्ठांनी सांगितले. त्यानंतर हे सर्व बारगळले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. तर, अनेकदा मी कमीपणा घेतला, माझ्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली. अनेकदा सांगितलं एक, निर्णय वेगळाच झाला, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
माझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की, कुठंतरी थांबायला हवं. एखाद्या गोष्टीचं वय असतं, असे म्हणत आमच्या भूमिकेला समर्थन द्या, अशी विनंतीच अजित पवार यांनी केली. मी शेतकरी कुटुंबातील पोरगा आहे, आमच्यात मुलगा २५ वर्षांचा झाली का वडिल शेताची जबाबदारी मुलाकडे देतात. उद्योगपतीही त्यांच्या बाबतीत तसंच करतात, असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय जबाबदारीतून शरद पवारांनी आता मुक्त व्हायला हवं, असे म्हटले. तसेच, पक्षाच्या कार्यक्रमातून मी जे बोललो त्यात काय चुकीचं होतं, मी सुप्रियालाही सांगितलं होतं, पण सुप्रिया म्हणाली की ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला.
भाषणाच्या शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, ते आपले दैवतच आहे, मी सांष्टांग नमस्कार करुन विनंती करतो. काही आमदारांची ससेहोलपाट होते आहे, इकडे आड-तिकडे विहीर, असं झालंय. आम्हाला आशीर्वाद द्या, असे म्हणत अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी शरद पवारांना साद घातली.
२०१९ मध्येही अचानक निर्णय बदलला
दरम्यान, २०१९ मध्ये ५ बैठका एका उद्योगपतीच्या घरी झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना कुठेही बोलायचे नाही हे सांगितले. पहाटेच्या शपथविधीला काय झाले हे मला अनेकदा विचारले. हे सर्व सुरू असताना अचानक बदल झाला आणि मला शिवसेनेसोबत जायचे हे सांगितले. २०१७ मध्ये शिवसेना नको असं म्हणत होते मग अचानक २ वर्षात असा काय बदल झाला, विचारांचे अंतर असू शकते. मतमतांतरे असू शकते. नेहमी वेगवेगळी भूमिका असं चालत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटले.