माझा ऐतिहासिक वांद्रे तलाव.. माझी जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:52+5:302021-07-07T04:07:52+5:30
मुंबई : पश्चिम उपनगरातील ऐतिहासिक वांद्रे तलावाची आज दयनीय अवस्था झाली आहे. नियमित सफाई होत नसल्याने या तलावात कचरा ...
मुंबई : पश्चिम उपनगरातील ऐतिहासिक वांद्रे तलावाची आज दयनीय अवस्था झाली आहे. नियमित सफाई होत नसल्याने या तलावात कचरा तरंगताना दिसून येतो. यामुळे स्थानिक नागरिकांनीच हा तलाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक, मृत मासे तलाव परिसरातून साफ करण्यात आले.
मुंबईत महापालिकेच्या अखत्यारीत ५१ तलाव आहेत. त्यातील बहुतांश तलावांची दुर्दशा झाली आहे. अतिक्रमण, कचरा, तलावात वर्षानुवर्षे साठलेला गाळ, यामुळे कधीकाळी शहराची ओळख असलेले ही तलाव मृतावस्थेत आहेत. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला जवळच असलेला वांद्रे तलाव हा साधारण २०० वर्षे जुना आहे. शहरातील इतर तळी नामशेष झाली असतानाच मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या मोजक्या ठिकाणांमध्ये या तलावाचा समावेश होतो.
वांद्रे तलावाचे २०१६ ते २०१९ या काळात सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र पुन्हा या तलावाची परिस्थिती जैसे थेच होऊ लागली आहे. गर्दुल्यांचा वावर असल्याने हे परिसर असुरक्षित होऊ लागले आहे. एकेकाळी पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या तलावाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक नागरिक सरसावले आहेत. या तलाव परिसरातील अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी केला नंतर गेल्या आठवड्यात प्रभाग समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती.