Join us

माझा अनिल देशमुख करण्याचा डाव, अमित शहांकडे रेकीची तक्रार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 11:19 AM

नवाब मलिकांनी(Nawab Malik) गंभीर आरोप ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊनही घराची रेकी होत असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देयाप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.  

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरुन NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी बळकावल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. वानखेडे आणि मलिक यांच्यातील वाद सुरू असतानाच आता घराची रेकी होत असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. याप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.  

नवाब मलिकांनी(Nawab Malik) गंभीर आरोप ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊनही घराची रेकी होत असल्याचे सांगितले. मलिकांनी ट्विट करत काहीजण या गाडीत बसून मागील काही दिवसांपासून माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे. जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावं. मी सगळी माहिती देईन असं त्यांनी सांगितले होते. आता, ती व्यक्ती भाजपशी संलग्नीत असल्याचं संशय त्यांनी व्यक्त केला आहे. 

माझा अनिल देशमुख करण्याचा डाव

मुंबई पोलीस आयुक्त आणि देशाच्या गृहमंत्र्यांना मी पत्र लिहून तक्रार करणार आहे. ज्या पद्धतीने गोष्टी पुढं येत आहेत, त्यावरुन हे अतिशय गंभीर असल्याचं मलिक यांनी म्हटलं. तसेच, केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्य सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान होत आहे. अनिल देशमुखांचं जे केलं, ते माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्या घराची रेकी करणाऱ्या व्यक्तींचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिल्यास त्यांची तार भाजपशी जुळल्याचं दिसून येतं, असेही ते म्हणाले. 

९ डिसेंबरपर्यंत विधान करणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनाई आदेश न काढल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी ९ डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबाविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची हमी नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाला द्यावी लागली आहे.  

टॅग्स :नवाब मलिकअमित शाहराष्ट्रवादी काँग्रेसअनिल देशमुख