समाजकार्यासाठी माय-लेकाचा छायाचित्रणाचा वसा, समाज विकासासाठी हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:13 AM2017-10-27T06:13:55+5:302017-10-27T06:14:09+5:30
मुंबई : आपला छंद असो वा आवड, त्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरिता हातभार लावणे हा विचार दुर्मीळच. मात्र, या विचारावर आधारलेले एक विशेष छायाचित्र प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीस येणार आहे.
मुंबई : आपला छंद असो वा आवड, त्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरिता हातभार लावणे हा विचार दुर्मीळच. मात्र, या विचारावर आधारलेले एक विशेष छायाचित्र प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीस येणार आहे. माय-लेकांनी आपल्या रोजच्या जगण्यातील छायाचित्रणाची आवड जपत, सामाजिक जबाबदारी ओळखून विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा यांचे देशभरातील विविध ठिकाणची प्राचीन परंपरा, कला संस्कृतीचे; तर त्यांचे पुत्र आर्यमन दर्डा यांनी जगभरातील जंगलातून वन्यजीव छायाचित्रे आपल्या कॅमेºयात बंदिस्त केली आहेत. या छायाचित्रांचा नजराणा २७ आॅक्टोबरला एका विशेष प्रदर्शनाच्या माध्यमातून खुला होणार आहे.
भायखळ्यामधील ‘द ग्रेट ईस्टर्न मिल कम्पाउंड’ येथील ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’ येथे, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्ष संगीता जिंदाल व प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
रचना देवेंद्र दर्डा यांनी राजस्थान, महाराष्ट्र, कोलकाता, मध्य प्रदेश आदी राज्यांतील विविध व्यक्ती, निसर्ग, प्राचीन स्थळे यांचे छायाचित्रण केले आहे. ‘ब्राऊन’ असे या प्रदर्शनाचे नाव असून यामध्ये देशभरातील मातीशी जोडलेल्या सर्वसामान्यांची वस्तुस्थिती दर्शविणाºया फोटोंचा समावेश आहे. या छायाचित्रांत त्या-त्या राज्यांतील संस्कृती आणि विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून येणारे सर्व उत्पन्न ग्रामीण भागातील पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. शिवाय, त्यांना शालेय साहित्य, गणवेश आदींसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.
दहावीत शिकत असलेले आर्यमन देवेंद्र दर्डा हे पंधरा वर्षांचे आहेत. शालेय अभ्यासाबरोबरच त्यांना लहानपणापासून पर्यावरण आणि निसर्गाच्या संवर्धनाची विशेष आवड आहे. त्यातूनच त्यांनी ‘लिटिल प्लॅनेट फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका येथे जंगल सफारी करीत, वन्यजीवन आपल्या कॅमेºयात टिपले आहे. पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ‘सँक्चुरी एशिया’ या संस्थेचे संस्थापक बिट्टू सहगल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यमन हे मागील सहा महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत.
या प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी वन्यजीवन आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी देण्यात येणार आहे. हे छायाचित्र प्रदर्शन २७ ते ३० आॅक्टोबरपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.