मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने कारागृहात आपल्या जिवाला धोका असल्याचा खळबळजनक खुलासा विशेष न्यायालयात सोमवारी केला. ‘कारागृहातील जेवण जेवल्यावर मला चक्कर आली. मी बाहेरून काहीही मागविले नव्हते. माझ्या जिवाला धोका आहे. पण मी याबाबत कारागृह महानिरीक्षकाला काहीही माहिती दिली नाही,’ असे इंद्राणीने न्यायालयाला सांगितले.यापूर्वीही इंद्राणीने कारागृहात तिच्या जिवाला धोका असल्याचा दावा न्यायालयात केला. आता जे. जे. रुग्णालयातून उपचार घेऊन परतलेल्या इंद्राणीने पुन्हा न्यायालयात याचा पुनरुच्चार केला. ६ एप्रिलच्या रात्री इंद्राणीला तातडीने जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे तिला आयसीयूमध्ये ठेवले. औषधाचा ओव्हरडोस घेतल्याने तिला चक्कर आल्याचे सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसांनी डॉक्टरांनी अँटी-डिप्रेशनच्या गोळ्यांमुळे इंंद्राणी चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे अहवालात म्हटले. आॅक्टोबर २०१५मध्येही इंद्राणीला जे. जे.त दाखल केले होते. त्या वेळीही डॉक्टरांनी औषधांच्या ओव्हरडोसने ती बेशुद्ध झाल्याचे सांगितले होते.शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणीला २०१५मध्ये अटक करण्यात आली. स्वत:च्याच मुलीची संपत्तीसाठी हत्या केल्याचा आरोप सीबीआयने इंद्राणीवर ठेवला आहे.इंद्राणीची सुनावणी आता ‘व्हीसी’द्वारे?आपल्या जिवाला धोका असल्याची भीती शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी ही न्यायालयात व्यक्त करीत असल्याने, तिची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)ने घेण्याबाबतचा विचार तुरुंग विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याबाबत आवश्यकतेनुसारलवकरच प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
माझ्या जिवाला धोका आहे - इंद्राणी मुखर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 05:22 IST