मुंबई : माझे जीवन हे खरे म्हणजे स्वत:चा शोध आहे, असे उद्गार सेवाव्रती रामकृष्ण नायक यांनी काढले. मुंबईत गोवा हिंदू असोसिएशन आणि स्नेहमंदिर संस्थांच्या माध्यमातून नायक व उद्योजक सुरेश कारे यांचा वांद्रे क्रिकेट क्लबच्या सभागृहात माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते शुक्रवारी हृद्य सत्कार करण्यात आला.रामकृष्ण नायक म्हणाले, प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे हा मी घेतलेला वसा होता. ही प्रेरणा मला वडिलांपासून मिळाली. महाराष्टÑ सरकारने मला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. कुठलेही लॉबिंग न करता हा पुरस्कार कसा मिळाला, असा प्रश्न मलाही पडला होता. मी कुणी कलाकार नव्हे. जे केले ते पडद्यामागे राहून. पण नंतर लक्षात आले की माझे कार्य संघटकाचे होते. अनेक अर्ज नाकारून माझी निवड झाली होती. मला या निवडीमागचे औचित्य पटले व मी पुरस्काराला संमती दिली.गोवा हिंदू असोसिएशनमधील आपले निष्ठावंत सहकारी अवधूत गुडे यांचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. उद्योजक सुरेश कारे म्हणाले, की आपल्याला अनेक मानसन्मान लाभले; पण हा घरच्या मंडळींनी केलेला सत्कार महत्त्वपूर्ण आहे. त्यात आपलेपणा आहे.ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागत गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कुवेलकर यांनी केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी ‘मत्स्यगंधा’ व ‘लेकुरे उदंड झाली’ या गोवा हिंदू असोसिएशन निर्मित नाटकांतील काही पदे रामदास कामत, माधुरी करमरकर व मंदार आपटे यांनी सादर केली. गोवा व महाराष्टÑातील नाट्यसृष्टी तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
माझे जगणे म्हणजे स्वत:चाच शोध - रामकृष्ण नायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:25 AM