मुंबई : यंदा बारावीच्या निकालात उत्तीर्णतेचा एकूण टक्का घसरला तरी मराठी विषयांतील पास होण्याचा टक्का मात्र वाढला आहे. मागील वर्षी मराठी विषयांतील उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८० इतकी होती. यंदा त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे इंग्रजीच्या विषयाने विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला आहे. इंग्रजी विषयामध्ये फक्त ८६.७८ टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. इतकेच नव्हे तर गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी इंग्रजीचा निकाल २.०६ टक्क्यांनी कमी झाला आहे.मंगळवारी जाहीर झालेल्या निकालाच्या आकडेवारीवरून विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबतची भीती कायम असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. याउलट फें्रच, जर्मन, जपानी या भाषांच्या निकालांत स्थिरता पाहण्यास मिळाली आहे. जपानी भाषेचा निकाल तर १०० टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या पास होण्याचा टक्का वाढला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या परीक्षेमध्ये १५१ विषयांपैकी तब्बल २१ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये मल्याळम, तेलगू, पंजाबी, जपानी, पर्यावरण शिक्षण, चित्रकला, मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयांचा समावेश आहे.यंदाच्या निकालात विशेषत: विज्ञान शाखेत अनेक विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या तीन विषयांत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. यंदा विज्ञान शाखेचा राज्याचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी झाला आहे. तर मुंबईचा विज्ञान शाखेचा निकाल यंदा ६.७६ टक्क्यांनी घसरला आहे. मुंबई विभागाचा गेल्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल ९३.१० टक्के इतका लागला होता. यंदा हा निकाल ८६.३२ टक्के इतका लागला आहे. यंदा मुंबई विभागातून ८५,६८१ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७३,९६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत एकही प्रश्न पर्यायी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड गेल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.रसायनशास्त्राचा निकाल गतवर्षी ९४.१९ टक्के इतका होता तर यंदा तो ८६.८७ टक्के इतका लागला आहे. तर भौतिकशास्त्र विषयाचा निकाल गेल्या वर्षी ९७.०३ टक्के इतका होता तर यंदा हा निकाल सुमारे ६.६ टक्क्यांनी घसरून ९०.४३ टक्के इतका लागला आहे. तर जीवशास्त्र विषयाचा निकाल पाच टक्क्यांनी घसरून ९५.२९ टक्क्यांवरून ९०.२४ टक्क्यांवर आला आहे. गणित विषयाचा निकाल ७.०५ टक्क्यांनी घसरून तो ८३.४८ टक्के इतका लागला आहे.>बारावीच्या परीक्षेत ‘ताई’गिरीबारावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून ८८.०४ टक्के मुली, तर ८०.१० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामुळे निकालात पुन्हा मुलींना आपला वरचश्मा राखण्यात यश मिळाले आहे. मुंबई विभागातून एकूण १,४९,०७९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यामध्ये १,३१,२५६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर एकूण १,६७,०२६ मुले बारावीच्या परीक्षेला बसली होती. त्यापैकी १,३३,७८४ मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का ८ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अभ्यास व परीक्षांमध्ये मुलीच सरस असल्याचे पाहायला मिळाले आहे.
माय मराठीचा टक्का वाढला, इंग्रजीने फोडला घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:24 AM